रामकथेतून ज्ञान व उपासनेबरोबरच सदाचरणाचेही धडे मिळतात – चंद्रतनय दादा

0
495

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – रामनामाचा महिमा अनन्यसाधारण असून रामनाम माणसाचे जीवन बदलून टाकते. रामकथेतून ज्ञान आणि उपासनेबरोबरच सदाचरणाचे धडेही मिळतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समर्थभक्त चंद्रतनय दादा यांनी केले.

श्री गोंदवलेकर महाराजांचे शिष्य असलेल्या रवींद्र पाठक यांनी स्वतःचा उद्योग-व्यवसाय सांभाळून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुलसी रामायणावर आधारीत 1300 दिवसीय रामकथा सादर केली. या रामकथेची सांगता गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर झाली. रामकथेच्या पूर्णाहुतीनिमित्त श्रोत्यांच्या वतीने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांचीही विशेष उपस्थिती लाभली. नामवंत गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या रंगतदार अभंगगायनाने उपस्थित श्रोते भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाले. मुसळधार पाऊस असतानाही कार्यक्रमासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

चंद्रतनय दादा म्हणाले की, 1300 दिवसांची रामकथा कथन करणे ही सोपी गोष्ट नाही. रवींद्र पाठक यांना कोणताही मोह नसल्यामुळे ते इथपर्यंत पोहचू शकले आहेत. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिलेल्या 13 अक्षरी राम मंत्रानेच पाठक यांच्याकडून ही 1300 दिवसांची रामकथा घडवून घेतली.

मोहनबुवा रामदासी यांनी रवींद्र पाठक यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कर्मापासून अलिप्त राहू शकतो, तोच हे काम करू शकतो आणि माणसाला कर्मापासून अलिप्त ठेवण्याचे काम रामनाम करते, असे ते म्हणाले.

ही रामकथा पूर्ण होत असताना रवींद्र पाठक यांनी त्यांचे आई-वडील, कथा घडवून आणणारे सत्संग मंडळ, आशीर्वचन देणारे संतमहात्मे, रामकथेतील विविध प्रसंगांचे अर्थ उलगडून सांगणारे विविध ग्रंथ आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या पाच जणांविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

चैतन्य गोशाळा ट्रस्टचे विश्वस्त हर्षदा पाठक, नागनाथ इनामदार, हिंदूराव पवार, सचिन नाईक आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. चंद्रशेखर निलाखे यांनी सूत्रसंचालन केले.