हास्यजत्रा’ फेम सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांच्याशी चिंचवडला रविवारी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम

0
379

दिशा फाऊंडेशनच्या वतीने मानपत्र प्रदान सोहळा

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (१७ जुलै) चिंचवड येथे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि ज्येष्ठ निर्माते व लेखक सचिन मोटे यांच्यासोबत दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गोस्वामी आणि मोटे यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सायंकाळी ५:३० वाजता गोस्वामी आणि मोटे यांना ‘दिशागौरव’ पुरस्कार व मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यानंतर, प्रसिध्द अभिनेता व लेखक संकर्षण कऱ्हाडे हे गोस्वामी आणि मोटे यांच्याशी संवाद साधणार आहेत.

तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. संजीवकुमार पाटील (अथर्व थिएटर्स), किरण येवलेकर (पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद), प्रभाकर पवार (पैस रंगमंच), अभय बलकवडे (सिनेमेटोग्राफी) यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. प्रथम येईल, त्यास प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले यांनी प्रसिद्धीस दिली आहे.