केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केलाय

0
398

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात तोंडाला पानं पुसल्या जातील तेव्हा त्यांच्यातील युद्ध अटळ आहे, असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलाय. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. शिंदे-फडणवीसांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विलंब लावला जात आहे. यावरून शिवसेना खासदार राऊतांनी उमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंच शिल्लक राहिलेत.

देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले असून त्यांची नाराजी मध्येमध्ये दिसते. केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केलाय, असा घणाघात राऊतांनी केलाय. विनायक राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले, शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत पहायला मिळेल. मंत्रिपद न मिळाल्यास अनेक आमदार मानगुटीवर बसणार आहेत. तोंडाला पाने पुसली गेल्यानंतर 100 टक्के शिंदे गटात बंडखोरी होणार आहे. अतृप्त आत्मे एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांना स्वत:चा आवाज नाही. त्यांचे बोलवते धनी दिल्लीत आहेत. देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले आहेत, असं राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.

शिवसेनेतून काही लोक बाहेर पडले तरीही जे उरले आहेत, त्यांच्यासोबत पुन्हा एकदा झेप घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. पावसाळा संपल्यानंतर उद्धव ठाकरे जिल्हा निहाय दौरा करणार आहेत. 23 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील पदाधिकारी मुंबईत त्यांची भेट घेण्यासाठी येतील. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून उद्धव ठाकरे महाराष्ट्रात दौरे आयोजित करतील, अशी माहिती राऊत यांनी दिली.