औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला? नामांतराच्या स्थगितीवरुन शिंदे फडणवीसांना संजय राऊतांचा सवाल

0
189

मुंबई, दि. १५ (पीसीबी) -महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या पाच निर्णयांना स्थगिती दिली असल्याची मला माहिती मिळाली. उद्धव ठाकरेंशी माझी याबाबत चर्चा झाली. ठाकरे सरकारने आणि खासकरुन उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचं नाव देण्यासंबंधी घेतलेले निर्णय रद्द केले असल्याचं खरं असेल, तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत नागपूर दौऱ्यावर असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी टीका केली.

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत.

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणास तूर्त स्थगिती
यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, “हेच भाजपावाले औरंगाबादचं संभाजीनगर कधी करत आहात असं विचारत होते. उस्मानाबादसंबंधीही तीच भूमिका होती दी बा पाटील यांच्या नावासाठीही यांनीच मोर्चे काढले होते. उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसंच कोणाचीही पर्वा न करता हिंमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत”.

“हे सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही, कारण याबद्दलचा निर्णय़ सुप्रीम कोर्टात व्हायचा आहे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

“नामांतर रद्द करुन काय साध्य केलं हे फडणवीसांना विचारलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही, त्यामुळे त्यांना विचारणार नाही. एकीकडे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करत आहात, आणि दुसऱ्या बाजूला औरंगाबाद, उस्मानाबादसंबंधी निर्णय़ाला स्थगिती का देत आहात? राजकीय, आर्थिक, बुलेट ट्रेनसंबंधी निर्णय समजू शकतो. आरेचा विषय तुमचा जिव्हाळ्याचा होता हे समजू शकतो. त्यासाठी आम्ही संघर्ष करु. पण औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? स्थगिती देण्यासाठी औरंगजेब तुमचा कोण लागतो? निजामाच्या काळातील उस्मान कोण लागतो? लोकभावनेचा आदर म्हणून दी बा पाटील यांचं नाव दिलं होतं,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “मला वाटतं हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या डोक्यावर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार असल्याने त्यांचा मेंदू बधिर झाला आहे. त्यांना काम करावंसं वाटत नाही आहे, त्यामुळे स्थगिती देत आहेत. पण स्थगिती देतानाही यांनी आपला विवेक हरवला आहे”.

शिवसेना संपवण्याची सुपारी केली असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी शिवसेनेचा मालक आहे का? ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. लाखो शिवसैनिक या शिवसेनेसाठी प्राण देण्यासाठी तयार आहेत. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असून शिवसेनेसोबत निष्ठेने राहणं याला कोणी शिवसेनेला संपवणं म्हणत असतील तर निष्ठेची व्याख्या बदलावी लागेल. ज्याप्रमाणे संसदेत आता नवीन डिक्शनरी आणली आहे. त्याच्यात ढोंगी, भ्रष्ट, गद्दार शब्द वापरायचा नाही सांगितलं आहे. हे बहुतेक त्यांनी आपल्यावरील कलंक धुण्यासाठी केलं आहे. आम्ही गद्दार नाही, शिवसेनेसोबत आहोत. ही शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावेल आणि महाराष्ट्राच्या सत्तेवर येईल यासाठी काम करत आहोत ही त्यांची पोटदुखी आहे”.

“संसदेत यापुढे काहीहीच करता येणार नाही. हात, पाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या बांधून आम्हाला जावं लागणार आहे. या देशात आणिबाणीपेक्षा जास्त भयानक स्थिती आहे. सरकारने आणीबाणीत सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतला आहे. आम्ही आणिबाणीविरोधात लढत आहोत, त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल,” असं संजय राऊत म्हणाले.

“चिठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात अशा बऱ्याच गमती-जमती राज्यात पहायला मिळत आहेत. यावर मी काय बोलणार? खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत,” असा टोला संजय राऊतांनी लगावला. आशिष देशमुख यांची स्वतंत्र विदर्भाची जुनी भुमिका आहे, पण काँग्रेस आमच्यासोबत आहे असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांवर टीका करताना ते म्हणाले की, “राज्यपालांचा वेळ जात नसेल तर लाटा मोजणे कार्यक्रम असू शकतो. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालांना कायदा आणि घटनेची फार जाण होती. मग आता ती घटना त्यांनी समुद्रात बुडवली का? हे पहावं लागेल”.