राजपुत्र अमित ठाकरे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता

0
199

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या साथीत राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने अनेकांना धक्का बसला होता. आता भाजप आणि शिंदे गट आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असून राजपुत्र अमित ठाकरे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना शह म्हणूनच अमित ठाकरे यांना मंत्रीमंडळात घेण्याचे घाटते आहे.

शिवसेनेतील उद्धव ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्यासाठी शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बळ देण्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. आदित्य यांनी निष्ठा यात्रा काढून शिवसेना पुन्हा उभी करण्यास सुरुवात केली आहे. अमित ठाकरे यांना मंत्रीपद दिल्यास आदित्य यांना शह देता येऊ शकतो, अशी रणनिती असण्याची शक्यता आहे.

या व्यतिरिक्त आगामी काळात देशातील सर्वात महत्त्वाची असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील मनसेला बळ देणे शिवसेनेला रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. ‘इकॉनॉमिक्स टाईम’च्या वृत्तानुसार शिवसेला धक्का देण्यासाठी ही भाजपची नवी खेळी असू शकते.

दरम्यान मनसेकडून मनसे नेत्यांनी याबाबत काहीही माहित नसल्याची प्रतिक्रिया दिली. तर भाजपकडून देखील कोणीही यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. अमित ठाकरे २०१४ मध्ये मनसेच्या विद्यार्थी आघाडीत सक्रिय असून ते विद्यार्थी आघाडीचे प्रमुख आहे.