इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

0
215

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – लोणावळाधरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात झाली आहे. पुढील ४८ तासात इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोणावळा धरणात जलाशय पातळी ६२३.९८ मीटर झाली असून पाणीसाठा ७.११ द.ल.घ.मी. (६०.७४ टक्के) आहे. विसर्ग टाळण्यासाठी जास्तीत – जास्त पाणी पश्चिमेकडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. तथापि, पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून इंद्रायणी उगमस्थान तथा मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणीचे दोन्ही बाजूंचे घाट पाण्याखाली गेले आहेत. मंगळवारी (दि.१२) रात्री उशिरापर्यंत नदीपात्रातील पाणी पातळी वाढत चालली होती. खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना इंद्रायणी नदीकडे जाण्यास मज्जाव केला आहे. इंद्रायणीकडे जाणाऱ्या रस्त्यांना बांबूची लाकडे लावून रस्ता अडवला आहे.