हुंडा, मानपानावरुन छळले म्हणून केली आत्महत्या

0
706

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) : आळंदी नगरपरिषदेच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने दोन दिवसांपूर्वी घरगुती कारणाहून आत्महत्या केली होती. आता या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. हुंड्यात ठरलेल्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून प्रियांका उमरगेकर यांचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून सुनेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी आळंदी पोलिसांनी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे , त्यांचे पती अशोक उमरगेकर आणि मुलगा अभिषेक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आत्महत्या केलेल्या प्रियांका घोलप या पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची ती कन्या होती.

याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियांका आणि अभिषेक यांचा ९ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आळंदीच्या भाजपाच्या माजी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर तसेच मुलीच्या घारातील व्यक्ती देखील राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने या विवाह सोहळ्याला अनेक राजकारणातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती.
मात्र, गेल्या नऊ महिन्यात नेमके काय कारण घडले की प्रियांका यांनी आत्महत्या केली. मात्र, आता ते कारण समोर आले आहे. लग्नानंतर सासरच्यांकडून छळ, अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती. या सगळ्या त्रासाला कंटाळून प्रियांका यांनी आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. यानुसार पोलिसांनी तपास करून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

प्रियांका उमरगेकर यांनी मरकळ रोड येथे असलेल्या आपल्या राहत्या घरात रविवारी सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी पोलिसांत याबाबत माहिती दिली होती. या घटनेमध्ये आता माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर- कांबळे, पती आणि मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.