आळंदी, दि. १२ (पीसीबी) – नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १०) सायंकाळी आळंदी येथे घडली. प्रियांका उमरगेकर (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. प्रियांका या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांच्या कन्या होत्या. प्रियांका यांचा विवाह आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या मुलासोबत मागील काही महिन्यांपूर्वी झाला होता. सुखी संसाराला अजून वर्षही झाले नव्हते. दरम्यान प्रियांका यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या आळंदी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
स्थानिक नागरिकांनी याबाबत आळंदी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर प्रियांका यांचा मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यावेळी उमरगेकर आणि घोलप या दोन्हीकडील नागरिकांनी वायसीएम परिसरात गर्दी केली. वायसीएम परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा तणाव कमी करण्यासाठी अधिकचा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ११) दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.












































