सुप्रीम कोर्टातील याचिकेवरची सुनावणी लांबणीवर ?

0
321

नवी दिल्ली , दि. ११ (पीसीबी) : राज्यातील सत्ता संघर्षासंबंधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज (११ जुलै) सुनावणी होणार होती. पण कोर्टाच्या यादीत या याचिकेचा समावेश नसल्यानं ती लांबवणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण तरीही कोर्टात प्रत्यक्ष काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि उद्धव ठाकरे यांची अग्निपरीक्षा असणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवत ४८ तासांत उत्तर मागवलं होतं. त्यानंतर शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण यामुळं शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत अनिश्चितता कायम आहे.

दरम्यान, काल उशीरापर्यंत सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीचा यादीत सामावेश झाला नव्हता. पण जर आज आयत्यावेळी सुनावणी पार पडली तर शिवसेनेच्यावतीन चार याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्या दिवशी शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतला निघून गेले त्यानंतर शिवसेनेनं व्हिप जारी केला होता. त्याचं पालन न केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात १६ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर सर्व बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत उपाध्यक्षांचे अपात्रतेचे आदेश बेकायदा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर कोर्टात याबाबत ११ जुलै रोजी सुनावणी घेणार असल्याचं म्हटलं होतं.

एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी सरकार स्थापनेची परवानगी देणं, विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यास परवानगी, विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश तसेच एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड कायम ठेवणे आणि अजय चौधरी यांची नवे गटनेते म्हणून नियुक्ती करणे या चार याचिका सुप्रीम कोर्टात शिवसेनेकडून दाखल करण्यात आल्या आहेत.