म्हाडा घरांसाठी अर्ज करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ ..

0
225

पुणे, दि. ९ (पीसीबी) – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध योजनेतील ५०६८ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. १८ ऑगस्ट रोजी सोडत जाहीर होणार आहे.

म्हाडा पुणे विभागाकडून जून महिन्यात पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), कोल्हापूर आणि सांगली परिसरासाठी तब्बल ५०६८ सदनिका आणि मोकळया भूखंडांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, नवीन एकत्रिकृत बांधकाम नियमन प्रणालीनुसार (युडीसीपीआर) उत्पन्न मर्यादेचे नियम लादण्यात आल्याने सुरूवातीच्या आठवड्यात सोडतीला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, नव्या नियमांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे दोन दिवस ऑनलाइन अर्ज प्रणाली बंद करण्यात आली होती. आता अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील म्हणाले, ‘राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून बांधकाम नियमावली तयार करण्यात आल्याने त्याचा परिणाम गृहनिर्माण क्षेत्रांवर मोठया प्रमाणात झाला. विशेषतः म्हाडाच्या अंतर्गत सर्वसमावेशक योजनेतील (२० टक्के) सदनिका सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच नागरिकांच्या देखील तक्रारी प्राप्त झाल्याने उत्पन्न मर्यादेचे नियम मागे घेण्यात आले. त्यामुळे सुरूवातीला सोडतीला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच दोन ते तीन दिवस ऑनलाईन प्रणाली बंद करण्यात आली होती. उत्पन्न मर्यादेची अट शिथिल केल्याने अर्ज येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार इच्छुकांना अर्ज भरण्यासाठीचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

४५ हजार ८६१ अर्ज प्राप्त –
जून महिन्यात म्हाडाकडून विविध योजनेंतर्गत ५०६८ सदनिकांमध्ये २७८ म्हाडाच्या सदनिका आहेत. २८४५ सदनिका प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर, तर १९४५ सदनिका सर्वसमावेशक योजनेतील असून एका महिन्यात ४५ हजार ८६१ अर्ज प्राप्त झाले आहेत, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.