तीन लाख मालमत्तांना मोबाइल क्रमांक लिंक; नागरिकांचा वाढता प्रतिसाद

0
194

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्तांना कर आकारणी केली जाते. मालमत्ताधारकांनी मोबाइल क्रमांक मिळकतींना लिंक केल्यास महापालिकेच्या विविध योजनांची माहितीसह त्यांना दरवर्षी महापालिकेच्या बिलाची लिंक उपलब्ध होणार आहे. आत्तापर्यंत साडेपाच लाख मालमत्तांपैकी 2 लाख 70 हजार मालमत्ता धारकांचे मोबाइल क्रमांक लिंक झाले आहेत. जास्ती-जास्त नागरिकांनी मालमत्ता बिलांना मोबाइल क्रमांक लिंक करावे, असे आवाहन कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 72 हजार मालमत्तांची नोंद आहे. या मालमत्तांना महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने कराची आकारणी करण्यात येत असते. नागरिकांना कर भरण्यासाठी शहराच्या विविध भागात कर संकलन विभागाचे 16 केंद्र आहेत. कर ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन कर भरण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेळोवेळी प्रोत्साहनही देण्यात येत असते. त्यामुळे ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ऑनलाइन कर भरताना नागरिकांकडून त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला जात आहे. हा क्रमांक मालमत्तांना लिंक होत आहे. मोबाइल क्रमांक लिंक झाल्यान मालमत्ताधारकांना महापालिकेच्या विविध योजनांची माहिती आणि दरवर्षी कराचे बिलाची मोबाइलवर लिंक येणार आहे. त्यामुळे नागरिकांना कर भरण्यास अधिक सोईचे होणार आहे. जेणेकरून एखादा नागरिक प्रवासात असला तरी तो कर भरू शकेल, हा महापालिकेचा उद्देश आहे.

याबाबत कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, ”नागरिकांना घर बसल्या जास्तीत-जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या कर संकलन विभागाचा सातत्याने प्रयत्न आहे. कर भरण्यासह ना हरकत दाखलाही ऑनलाइन काढण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता धारकांनी ऑनलाइन कर भरला तरच मालमत्तांना मोबाइल क्रमांक लिंक करता येत आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मिळकत धारकांनी ऑनलाइन कर भरावा’