जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबिर

0
420

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनाच्या निमित्ताने दि. 11 ते 16 जुलै 2022 दरम्यान मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हे शिबिर दि 11 जुलै पासून सुरू होत असून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या हाय-टेक इमारत पहिला मजला, प्लास्टिक शल्यचिकित्सा विभाग बाह्यरुग्ण विभाग OPD क्र 9 मध्ये सकाळी 9 ते दुपारी 4 वा यावेळत हे शिबिर होत आहे.

या शिबिरात भाजलेले रुग्ण, न भरणाऱ्या जखमा, नाक व कानाचे जन्मजात व्यंग, दुभंगलेले टाळू व ओठ, लायपोसक्शन, ब्रेस्ट इम्प्लांट, कॉस्मेटिक सर्जरी, अपघातात कापलेले स्नायू व नस, व्रण, जबड्याचे फ्रॅक्चर, कारखान्यात झालेल्या हाताच्या जखमा व फ्रॅक्चर, भाजलेले रुग्णांचे मानेचे व हातांची सर्जरी, बेड सोर, ब्रेकियल प्लेक्सस इंजुरीच्या उपचारांबरोबर तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. लहान मुलांमधील हात व चेहऱ्याच्या जन्मजात व्यंगावर विशेष मार्गदर्शनाचा लाभ सुद्धा आपण विनामूल्य घेऊ शकणार आहात.

चिकित्सेसाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी आंतररुग्ण विभागात मोफत राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त रुग्णानी येथील सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या प्लास्टिक शल्यचिकित्सा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी डॉ. ध्रुव चव्हाण 9420607085, डॉ. उज्वला सोनवणे 9653509999 यांच्याशी संपर्क साधावा.