सोनोग्राफी सेंटर प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी घेतली लाच

0
417

जिल्हा शल्य चिकित्सकासह तिघांना अटक

सांगवी, दि. ८ (पीसीबी) – सोनोग्राफी सेंटर प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी 12 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 6) सायंकाळी औंध जिल्हा रुग्णालय आणि समता नगर चौकातील एका चहाच्या दुकानात करण्यात आली.

सहाय्यक अधीक्षक लिपिक संवर्ग संजय सीताराम कडाळे (वय 45, रा. गणेशनगर, बोपखेल), जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव बापूराव कनकवळे (वय 50, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. नांदेड), प्रशासकीय अधिकारी महादेव बाजीराव गिरी (वय 52, रा. नवी सांगवी. मूळ रा.अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षय तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी मधील इमेजसेन्स डायग्नोस्टिक सेंटर येथे फिर्यादी मार्केटिंग एक्झिकेटिव्ह म्हणून काम करतात. त्यांचे एक सेंटर इमेजसेन्स डायग्नोस्टिक शिक्रापूर येथे आहे. त्याचा नूतनीकरण परवाना मिळण्यासाठी त्यांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात अर्ज केला होता. त्यानंतर तो अर्ज सिव्हिल सर्जन (जिल्हा शल्य चिकित्सक) औंध रुग्णालयात शिफारशीसाठी पाठवला. औंध जिल्हा रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक आरोपी संजय कडाळे यांनी नूतनीकरण परवाना देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकरिता 40 हजार रुपयांची लाच मागितली.

दरम्यान फिर्यादी यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. बुधवारी समता नगर चौकातील एका चहाच्या दुकानात आरोपीने फिर्यादीकडून 12 हजार रुपये लाच घेतली. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून प्रथम संजय कडाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करून नंतर अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना शनिवार (दि. 9) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करीत आहेत.