…म्हणजे आता उध्दव ठाकरे यांनाही पटले, धनुष्यबाण जातोय – शंभुराजे देसाई

0
199

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – महाविकास आघाडीचं सरकार जाऊन आता राज्यात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेची पुढची रणनीती काय असणार आहे? यावर राजकीय विश्लेषक वेगवेगळी मतं मांडत आहेत. खुद्द उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहात लढा देण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. शिवसेना भवनमधून उद्धव ठाकरे राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मात्र, ५५ पैकी ४० आमदार फुटून निघाल्यामुळे मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह बंडखोरांकडे जातंय की काय? अशी शक्यता निर्माण झालेली असताना त्यावरून आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये देखील चलबिचल असताना खुद्द उद्धव ठाकरेंनीच नव्या चिन्हाचे सूतोवाच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरेंची भूमिका आणि आगामी राजकीय परिस्थिती यावर टीव्ही ९ शी बोलताना भाष्य केलं आहे.“आम्ही आधीपासून हे सांगतोय. ५५ पैकी ४० आमदारांनी शिवसेनेत उठाव केला आहे. हीच खरी शिवसेना आहे. दोन तृतियांशपेक्षा जास्त बहुमताने निवडून आलेले प्रतिनिधी म्हणाले की आपण महाविकास आघाडीत राहाणं चुकीचं आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना तशी विनंतीही केली होती. पण ते शक्य न झाल्यामुळे आम्ही उठाव केला. दोन तृतियांश लोकप्रतिनिधींनी उठाव केल्यामुळे आम्हीच मूळ शिवसेना आहोत. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह हे आमचंच आहे”, असं शंभूराजे देसाई म्हणाले आहेत.

“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जो उठाव केला आहे, ती आमची शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंनी हे जे वक्तव्य केलं आहे, त्याचा अर्थ आता त्यांनाही खात्री पटली आहे की आम्हीच मूळची शिवसेना आहोत. शिवसेनेचं चिन्ह आमच्याकडेच राहणार आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं असावं की दुसरं चिन्ह मिळालं तर ते लोकांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे मला खात्री आहे की धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हालाच मिळणार आहे”, असा विश्वास यावेळी शंभूराजे देसाई यांनी बोलताना व्यक्त केला.

धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. त्याआधी निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असतील. मात्र यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन केलं आहे.

“२०१९च्या निवडणुकांपासून आम्ही अनेक लोक उद्धव ठाकरेंना सांगत होतो की आपण भाजपासोबतच युती करायला हवी. आम्ही खूप प्रयत्न केले. शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंना विनंती केली. पण शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून नाईलाजाने आम्हाला महाविकास आघाडीत राहावं लागलं. पण अडीच वर्षात शिवसेना आमदार-मंत्र्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला”, अशा शब्दांत शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना धाकट्या भावाप्रमाणे मानतात. त्यामुळे उद्धव ठाकरे थेट मोदींसोबत बोलले तर यातून मार्ग निघू शकेल. आम्ही ४० आमदार मूळची शिवसेना आहे. त्यामुळे भाजपासोबत नैसर्गिक युती करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय, त्याला आशीर्वाद देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या मनाने करावं”, अशी विनंती देसाई यांनी यावेळी केली.