प्रसिद्ध अभिनेते, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना २६ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ?

0
229

नवी दिल्ली,दि.०८(पीसीबी) – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि कॉग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना एम पी – एमएलए कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना शिक्षा झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदारांची दिशाभूल करणे आणि पोलिंग एजंटशी वाद घातल्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. राज बब्बर यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या कारवाईमध्ये न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

वजीरगंज पोलीस ठाण्यामध्ये राज बब्बर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील अभिनयानं राज यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये उडी घेत लोकप्रियता मिळवली. कॉग्रेसचे निष्ठावान नेते अशीही त्यांची ओळख आहे. दिल्लीच्या राजकारणात महत्वाचे स्थान असणाऱ्या राज बब्बर यांचा राजकीय प्रवास देखील मोठा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते बॉलीवूडपासून लांब असले तरी बॉलीवूडच्या महत्वाच्या सोहळ्यांना त्यांची उपस्थिती दिसून आली आहे.

एमपी एमएलए कोर्टानं राज यांना दोन वर्षांची शिक्षा आणि साडेसहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण 2 मे 1996 मधील वजीरगंज येथील आहे. याप्रकरणात मतदान अधिकारी श्रीकृष्ण सिंह राणा यांनी राज बब्बर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी केवळ राजच नव्हे तर अरविंद यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज बब्बर यांनी मतदान अधिकारी यांचे नियम आणि आदेश धुडकावून लावत मतदान केंद्रात प्रवेश केला. आणि मतदारांची दिशाभूल केली. असा आरोप त्यांच्यावर होता.