पुणे, पिंपरी चिंचवडचे आयुक्त, पोलिस आयुक्त बदलण्याची शक्यता

0
212

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यातील काही बदल्यांना नव्या शिंदे सरकारकडून स्थिगिती देण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबादमधील बदल्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या असल्याने त्यांच्याही बदल्या होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीकडून सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली औरंगाबाद महापालिकेत आयुक्त म्हणून तर सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर औरंगाबाद पालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबादला सिडकोत दीपा मुंडे यांच्या जागी बदली करण्यात आली होती. या सर्व बदल्या शिंदे सरकारानं रद्द केल्या आहेत. औरंगाबाद शहरासाठी ही महत्वाची घडामोड ठरली आहे.

यापूर्वी जे जीआर काढले गेले किंवा बदल्या झाल्या होत्या त्या जुन्या महाविकास आघाडी सरकारला अनुकूल अशा होत्या. नवं सरकार आल्यानंतर ते स्वतःला अनुकूल अशा आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यावर भर देणार आहे. या गोष्टी सरकारमध्ये नेहमीच होत असतात.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शासकिय आधिकारी हे अजित पवार यांच्या मर्जीतले आहेत. दोन्ही महापालिकांचे आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, पीएमआरडीए चे मुख्याधिकारी यांचा त्यात समावेश असल्याने शिंदे आणि फडणवीस सरकार संबंधीत अधिकाऱ्यांच्या बदल्या कऱणार असल्याचे सांगण्यात आले. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पवार यांच्याशी संबंधीत अधिकाऱ्यांची उचलबांगडी करुन तिथे आपल्याला हवे ते अधिकारी आणायची चढाओढ सुरू झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तार होताच सबंधीत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय होणार असल्याचे समजले.