अंतिम मतदारयाद्यांसाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ, प्रशासकांनी दिली माहिती

0
306
पुणे, दि. ६ (पीसीबी)- पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यास १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती घेण्यात आल्याने त्याची पडताळणी करण्यास महापालिकेने अधिक वेळ मागितला होता. त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी ही माहिती दिली. महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर चार हजारांहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांनीही या याद्यांवर तीव्र आक्षेप नोंदवले होते. हरकती नोंदविण्याची मुदत ३ जुलै रोजी संपली. मूळ वेळापत्रकानुसार नऊ जुलै रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. मात्र, मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने हरकतींची पडताळणी करून निर्णय घेऊन अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी निवडणूक आयोगाने १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे, असे विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.

पोलिंग बूथनिहाय होणार मॅपिंग
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभानिहाय मतदारयाद्यांवरून प्रारूप मतदारयाद्या तयार केल्या आहेत. यात कोणतीही नावे समाविष्ट करण्यात; अथवा वगळण्यात आलेली नाहीत. मात्र, तरीही मतदारयाद्यांवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप आले आहेत. त्यामुळे आता जिथे आक्षेप नोंदविण्यात आलेले आहेत, त्या याद्यांचे विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदान केंद्रनिहाय (पोलिंग बूथ) गुगल मॅपिंग केले जाणार आहे. परिणामी, मतदारांचे नाव योग्य यादी व बूथवर येऊन मतदार यादीबाबतचे आक्षेप दूर होतील, असे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.