चारचाकींसाठी नवीन मालिका; आकर्षक क्रमांक राखून ठेवता येणार

0
398

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच चारचाकी वाहनांसाठी ‘केएफ’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक विहीत शुल्क भरून राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकासाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी –चिंचवड, नवीन इमारत, मोशी येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. तसेच यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा यासाठी ही कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असल्यास चारचाकी वाहन मालकांनी ११ जुलै रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.

अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. हा डीडी ‘डीवाय. आर.टी.ओ. पिंपरी चिंचवड’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.