मुख्ममंत्री झालो नाही याचे दुःख नव्हते…

0
140

नागपूर, दि. ५ (पीसीबी) : २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मतदान केले होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. महाराष्ट्रात चुकीचे सरकार स्थापन झाल्याने अस्वस्थ वाटत होते. मी मुख्ममंत्री झालो नाही याचे दुःख नव्हते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिजन समोर नेणारे सरकार महाराष्ट्रात आले नाही याचे दुःख होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. ५) प्रथमच नागपुरात आले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला नाही. आग्रह केला असता तर मुख्यमंत्री पद मिळालं असतं. आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता. मी म्हटलं म्हणून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष मजबूत होत होते. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद निर्माण झाली होती. यातूनच एकनाथ शिंदे यांनी उठाव करण्याचा निर्णय घेतला. कोणीतरी बाळासाहेबांचे विचार घेत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. यामुळेच भाजपने एकनाथ शिंदे यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मला मुख्यमंत्रीपदाची कोणतीही आवड नव्हती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन पुढे नेता येणार नाही, हे माहित झाल्याने दुःख झाले. यामुळे योग्यवेळी योग्य गोष्टी करणार हे ठरवले होते. यासाठी लक्ष ठेवून होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळ्या होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना सहकार्य करण्याचे आम्ही ठरवले. तसेच बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे ठरवले, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.