नाले तुंबण्याचे प्रकार टाळण्यासाठी आता ‘चैन लिंक फेन्सिंग’

0
169

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – रस्त्यांच्या खालून जाणाऱ्या नाल्यांमधील मोठ्या पाईपांच्या तोंडाशी दोन मीटर उंचीचे चैन लिंक फेन्सिंग (मोठ्या तारा) लावण्यात येणार आहेत. कचऱ्यामुळे नाले तुंबण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हे काम हाती घेतले आहे. या कामासाठी 42 लाख रुपये खर्च होणार आहे.

 पिंपरी-चिंचवड शहरात छोटे-मोठे मिळून 70 नाले आहेत. रस्त्यांच्या खालून जाणाऱ्या नाल्यांमध्ये सीडी वर्कअंतर्गत मोठे पाइप टाकले जातात. मात्र, काही नागरिक रस्त्याने ये-जा करताना केरकचरा, निर्माल्य या नाल्यांमध्ये टाकतात. त्यामुळे कचरा साठून नाल्यातून वाहणारे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. नाला चोकअप झाल्याने प्रदूषित पाण्यामुळे दुर्गंधी सुटते.

याचा परिणाम पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्यांमधील पाइपमधून वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन नाले तुंबून पाणी रस्त्यावर येते. बऱ्याचदा पावसाचे पाणी नाल्यालगतच्या घरे, दुकानांमध्ये घुसते. यात नागरिकांना हकनाक आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. ही परिस्थिती टाळण्यासाठी तसेच शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी नाल्यांच्या सीडी वर्कच्या खालच्या आणि वरच्या बाजूला दोन मीटर उंचीचे चैन लिंक फेन्सिंग (मोठ्या तारा) लावण्यात येणार आहेत.

शहरात पुणे-मुंबई महामार्ग, पुणे – नाशिक महामार्ग, सांगवी- मुकाई चौक रस्ता, भक्ती-शक्ती चौक ते लांडेवाडी चौक रस्ता (टेल्को रोड), वाय जंक्शन ते हिंजवडी हे मुख्य रस्ते आहेत. या मुख्य रस्त्यांवर एकूण 50 ठिकाणी नाल्यावर सीडी वर्कचे काम करण्यात आले आहे. प्रत्येक सीडी वर्कच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूला म्हणजेच 100 ठिकाणी चैन लिंक फेन्सिंग बसविण्यात येणार आहे. या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार, या कामासाठी 42 लाख 67  हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ‘अमृत मिशन प्रोत्साहन अनुदान स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत अंतर्भूत घटकाच्या कामांसाठी 3 कोटी 32 लाख 20 हजार रुपये उपलब्ध आहेत. या कामातून चैन लिंक फेन्सिंगचे काम करण्यात येणार आहे.