मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नवी चाल

0
207

पुणे, दि. ५ (पीसीबी) – काही बंडखोरांची मोट बांधून स्व:पक्षाला अर्थात, शिवसेनेलाच खिंडार पाडून मुख्यमंत्रीपद मिळवलेल आणि आता अख्ख्या शिवसेनेवरच ताबा घेण्याच्या तयारी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या नगरसेवकांना फोडण्याची मोहीम उघडली आहे. मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेच्या काही असंतुष्ठ आजी-माजी नगरसेवकांना शिंदे यांनी गळ टाकला असून आगामी निवडणुकित त्यांना उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.

पुण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरेंना गळाला लावून, पुण्यातही शिंदे गट बळकट करण्याची चाल खेळण्यास सुरवात केली आहे. भानगिरे यांना हाताशी धरून पुण्यातील बहुतांशी आजी-माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याची शिंदेंची व्यूहरूचना दिसत आहे. भानगिरे यांच्या पुणे महापालिकेत शिवसेनेचे दहा नगरसेवक होते. त्यात भानगिरे तिसऱ्यांना नगरसेवक झाले होते. याच पंधरा वर्षांच्या काळात त्यांनी दोनदा विधानसभेच्या निवडणुका लढल्या आहेत. जुन्या नगरविकास खाते असल्यापासून शिंदे आणि भानगिरे यांच्यात जवळीक होती. पुण्यातील विविध प्रकल्पांसाठीचे प्रस्ताव मांडून ते शिंदेंकडून लगेच मंजूर करून घेत, भानगिरेंनी आपली चुणूक दाखवून दिली होती. तेव्हापासून शिंदे-भानगिरे यांच्यात मैत्रीही होती. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या चारच दिवसांत त्यांची भेट घेऊन भानगिरे यांनी नव्या राजकीय वाटचालीचे संकेत दिले. भानगिरे यांच्याकडे शिंदे गटाची पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे नऊ पैकी चार नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत, तर उर्वरित ठाकरे यांचे समर्थक आहेत. एकनाथ शिंदे यांनी इथेही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न सुरू केला असून सातारा जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांना त्यासाठी हाताला धरले आहे, अशी चर्चा आहे.