मुंबई, दि. ३ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करणारी पोस्ट टाकल्याबद्दल शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आपल्याला हा निर्णय एकूण धक्का बसल्याचे आढळराव यांनी पीसीबी टुडे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. अखेर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध स्तरातून एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील सोशल मीडियावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही.
शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. हा पराभव आढळराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला.
संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य –
सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असा एल्गार खासदार संजय राऊत यांनी शिरुरमध्ये जाऊन केला होता. आढळरावांचं शिवसेनेसाठीचं काम मोठं आहे. त्यांच्या पाठीमागे उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असंही राऊत म्हणाले होते. मे महिन्यात संजय राऊत शिरुर लोकसभा मतदारसंघातच आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असं सांगितलं होतं
मलाही धक्का बसला – शिवाजीराव आढळराव पाटील
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी पीसीबी टुडे प्रतिनिधीने संपर्क केला असता ते म्हणाले, अहो काल रात्रीच मी स्वतः आमचे नेते उध्दव ठाकरे यांच्याशी सविस्तर बोललो आणि सकाळी पाहतो तर ही बातमी.
मलाही धक्का बसला. रात्री अगदी सविस्तर बोलणे झाले, मी मंगळवारी भेटायला जाणार होतो. शिंदे यांचे अभिनंदन केल्याबद्दलची पोस्ट कशी म्हणून साहेबांनी विचारणा केला. त्यावर मी काय के सांगितले. शिवसेनेशी मी १८ वर्षे प्रामाणिक राहिलो, याची जाण करून दिली. त्यानंतर स्वतः ठाकरे म्हणाले, होय तुम्ही जाणार जाणार अशी चर्चा अनेकदा होती, पण तुम्हा आढळ राहिलात. नंतर आम्ही मंगळावीर भेटायचेही ठरले होते, पण सकाळी पाहतो तर ही बातमी, मलाही धक्का बसला. आता या विषयावर आज दुपारी १ वाजता माझ्या लांडेवाडी या निवासस्थानी मी प्रेस घेणार आहे.












































