पिंपरी, दि. २ (पीसीबी) – अजित पवार यांनी पुन्हा सर्व ताकद पणाला लावून पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेण्याचा निश्चय कल्याने आता या महापालिकेत भाजपाचीच सत्ता कायम ठेवण्यासाठी भोसरीकर आमदार महेश लांडगे यांनी मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. पुणे शहरातून चंद्रकांत पाटील व माधुरी मिसाळ तर जिल्ह्यातून राहुल कूल यांची नावे चर्चेत आहेत.
शिंदे-फडणवीस जिंकून देणारे सहकारी निवडणार –
ठाकरे सरकारमध्ये एकूण ३३ कॅबिनेट मंत्री आणि दहा राज्यमंत्री होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मंत्रीमंडळाची व्यूहरचना करतील. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी दोन हात करून विजय मिळवून देणारे सहकारी ते निवडतील यात कोणतीही शंका नाही. कारण कारभारासाठी हाती दोन वर्षांचाच कालावधी असणार आहे, त्यातही निवडणुकांचा हंगाम पाहता मोठ्या जोमाने या जोडीला काम करावे लागणार आहे.
संभाव्य मंत्री म्हणून चर्चेतील नावे –
नव्या मंत्रिमंडळामध्ये विद्यमान मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभूराज देसाई, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासोबत नव्याने दीपक केसरकर, संजय शिरसाट, भरत गोगावले, तानाजी सावंत, संजय राठोड, शहाजी पाटील यांची शिंदे गटाकडून वर्णी लागेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. भाजपमध्ये मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद जाण्याची दाट शक्यता आहे. कारण मागील काळात त्यांनी हे पद स्वतःकडेच ठेवले होते. सत्ताप्राप्तीसाठी त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा, याचा राजकीय वस्तुपाठ त्यांनी घालून दिला होता. याशिवाय सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक, संभाजी पाटील-निलंगेकर, राणा जगजितसिंह पाटील, संजय कुटे, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, जयकुमार गोरे, विनय कोरे, राम शिंदे किंवा गोपीचंद पडळकर, नीतेश राणे, महेश लांडगे किंवा राहुल कुल असे मंत्री होतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, अपक्षांसह छोट्या पक्षातील दोघे मंत्रिमंडळात असू शकतात.
आमदार महेश लांडगे हे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक मोहिमेत सहभाग असतो. आमदार लांडगे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा स्पर्धेसाठी फडणवीस अवर्जून उपस्थित होते, त्याचवेळी आगामी काळात भाजपाचे सरकार आल्यावर लांडगे मंत्री होतील अशी शक्यता बळावली होती. शिवसेना बंडखोरांची गोव्यातील बडदास्त ठेवण्याची तसेच त्यापूर्वी गोवा विधानसभा मतदारसंघ निवढणुकितही आमदार लांडगे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या मर्जीतील आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्यावेळी २०१७ मध्ये आमदार लक्ष्मण जगातप यांनी सर्व युक्त्या वापरुन अजित पवार यांच्या ताब्यातील महापालिका भाजपाला मिळवून दिली. आमदार जगताप यांचे प्रकृती स्वास्थ ठिक नसल्याने आता तिच जबाबदारी आमदार लांडगे यांच्याकड असणार आहे. त्याशिवाय आगामी लोकसभा निवढणुकिसाठी राष्ट्रवादीच्या ताब्यातील शिरुर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणूनही आमदार लांडगे यांच्याकडे पाहिले जाते. त्यासाठी म्हणून मंत्रीमंडळात लांडगे यांचा समावेश होऊ शकतो.