पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणात 12 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. शहरात मागील अडीच वर्षापासून एकदिवसाआडच पाणीपुरवठा सुरु आहे. पुढीस 8 दिवस पाऊस पडला नाही. तर, पाणी कपात म्हणजेच पाणी सोडण्याच्या वेळेत कपात केली जाणार असून त्याचे नियोजन सुरु असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.
पवना धरणात आजमितीला केवळ 17.79 टक्के पाणीसाठा आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा, सद्यस्थितील पर्जन्यमान याबाबी विचारात घेऊन महापालिकेने दैनंदिन पाणीवापर अत्यंत काटकसरीने करावा. दैनंदिन पाणीवापर असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर गेल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यानुसार महापालिका पाणीपुरवठा विभागाची बैठक झाली. त्यात पाणी कपात करण्याबाबत चर्चा झाली.
पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, ”शहरात 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआडच पाणीपुरवठा सुरु आहे. आणखी 8 दिवस पावसाची वाट बघितली जाईल. पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पाऊस पडेल. पुढील 8 दिवस जर पाऊस झाला नाही. तर, पाणीकपात केली जाईल. महापालिकेने पाणीपुरवठा करण्यासाठी झोन केले आहेत. लोकसंख्या, क्षेत्रफळानुसार झोन केले आहेत. त्यानुसार वेळ निश्चित केली असून पाणीपुरवठा केला जातो. ज्या झोनमध्ये जास्त कालावधीसाठी पाणीपुरवठा केला जातो. त्या झोनमधील वेळ कमी केली जाणार आहे. वेळेत कपात केली जाईल. पवना धरणातून महापालिका दिवसाला 510 एमएलडीच पाणी उचलेल. त्यात कपात केली जाणार नाही”.