मुंबई, दि. २ (पीसीबी) : राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर आता त्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रात देखील उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना एकच धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने हा निर्णय घेता असून या संघटनेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण आहेत.
भारतीय कुस्ती महासंघाची दिल्लीत झालेल्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून काही दिवसात हंगामी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा संघटना आणि मल्लांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचे कळते. आजी आणि माजी मल्लांकडून गेल्या अनेक वर्षात तक्रारी केल्या जात आहेत. या वर्षी देखील परिषदेविरोधात तक्रारी दिल्या गेल्या होत्या अशी माहिती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी दिली.
याच बरोबर गेल्या काही वर्षांपासून महासंघाने राज्य परिषदेला १५ आणि २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यास सांगितले होते. पण ही विनंती परिषदने फेटाळण्यात आली होती. त्यामुळे देखील महासंघाची नाराजी होती. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार बृजभूषण आहेत. काही दिवसांपूर्वी बृजभूषण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. यामुळेच आता महासंघाच्या या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.