मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राज्यात एकनाथ शिंदेंनी सत्तानाट्याला सुरुवात केली. त्यानंतर एक एक करत सर्वच बड्या नेत्यांनी त्यात उड्या मारल्या व आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या. या सर्वात अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, कुठेच दिसले नाहीत. एकदा शरद पवार यांनी या बंडामागे भाजपचा वरदहस्त आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यावेळी अजित पवार यांनी मात्र अगदी उलट “मला नाही वाटत, भाजपचा हात आहे” अशी प्रतिक्रिया दिली होती.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील सर्व आमदार अजित पवारांवर नाराज आहेत. त्यांच्या बंडामागे अजित पवार निधी देत नाहीत, हुकुमशाही करतात अशी कारणे असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अजित पवारांना सध्या व्हिलन ठरविले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर त्यात भाजपचा हात नाही, असे अजित पवार बोलले होते. त्यांच्या या वक्तव्यावर त्यांना विचारले असता त्यांनी, शरद पवार यांचा शब्द अंतिम असतो, त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला येत नाहीत असे क्वचितच घडले असेल. पण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार गैरहजर होते. आता सुद्धा ते दोन तास गायब होते या बातमीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आता अजित पवार आपल्या सुरक्षारक्षकांशिवाय दोन तास कुठेतरी गायब होते असा तक्रारवजा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीमधल्याच एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. राज्यात सध्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना जरी चालू असला तरी सर्वांचे बारीक लक्ष अजित पवार यांच्या भुमिकेकडे आहे. 2019 च्या सत्तास्थापनेच्या संघर्षात सुद्धा अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला होता. हे सत्य सर्वांना संशय घेतल्याशिवाय राहु देत नाही.