अग्निपथ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात : डॉ. कैलास कदम

0
278

अग्निपथ ही योजना फसवी आहे : डॉ. कैलास कदम

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – केंद्र सरकारने सुरू केलेली “अग्निपथ” योजना युवकांना बेरोजगारीच्या खाईत लोटणारी आहे. संरक्षण खात्याचे हे खाजगीकरण सुरू करण्याची सरकारची सुरुवात आहे. ही योजना जो पर्यंत सरकार मागे घेत नाही तो पर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

अग्निपथ ही योजना फसवी आहे हे नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्यावतीने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि.२७ जून २०२२) अनुक्रमे काळेवाडी एम. एम. हायस्कूल चौक, पुणे मुंबई महामार्ग चिंचवड स्टेशन येथे आणि साने चौक येथे आंदोलन करून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे तसेच महिला काँग्रेसचे शहर अध्यक्ष सायली नढे, माजी महापौर कवीचंद भाट तसेच अभिमन्यू दहीतुले, नरेंद्र बनसोडे, वीरेंद्र गायकवाड, उमेश खंदारे, नंदाताई तुळसे, प्रियंका कदम (मलशेट्टी,) चंद्रकांत उमरगीकर, संदीप शिंदे, आबा खराडे, हिराचंद जाधव, नितीन खाजेकर, अबूबकर लांडगे, विपुल मलशेट्टी, सुधाकर कुंभार, अण्णा कसबे, बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, विजय ओव्हाळ, दीपक भंडारी, सतीश भोसले, बाबा वाघमारे, महानंदा कसबे, सचिन पवार, चिदानंद जमादार, मिलिंद बनसोडे, उमेश बनसोडे निवृत्ती भोसले, तात्या कांबळे, मनोज खवळे, समाधान दगडे, भारती चांदणे, अंबादास शिंदे, रमेश काकडे, आकाश शिंदे, नरेंद्र अहिरे, वैशाली शिंदे, राजू वायसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, अग्निपथ या योजनेखाली केंद्र सरकार दरवर्षी ४६ हजार युवा सैनिकांची ४८ महिन्यांसाठी भरती करणार आहे. यापैकी ६ महिने प्रशिक्षणात जाणार आहेत. एकूण ४८ महिन्यानंतर या युवकांना ११ लाख ६७ हजार रुपये देऊन घरी पाठवले जाईल. यानंतर या युवकांना भविष्यात कोणत्याही नोकरीची हमी नाही. त्यांना निवृत्तिवेतन मिळणार नाही. ग्रॅच्युईटी, वैद्यकीय भत्ते असे कोणते फायदे मिळणार नाहीत. एरवी सैनिक भरती मध्ये पाच ते सहा वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. नौदल आणि हवाई दलामध्ये आता अधिकाधिक तंत्रकुशलता वाढत आहे. कोणत्याही युवकाला किंवा हवाई दलातील सैनिकाला सहा महिन्यात प्रशिक्षण देता येणे शक्य नसल्याचे एडमिरल अरुण प्रकाश यांनी यापूर्वी सांगितले आहे. सात वर्षांपूर्वी भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात जाहीर केले होते की, दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करून या सात वर्षात १४ कोटी नवीन रोजगार युवकांना मिळणे अपेक्षित होते. हे आश्वासन फोल ठरले असून आता मूळ कायमस्वरूपी जागा लाखो शिल्लक असताना पुन्हा अग्निपथ सारखी योजना केंद्र सरकारने पुढे आणली आहे या योजनेतून भविष्यात युवकांना रोजगार उपलब्ध होणे ऐवजी बेरोजगारीत वाढ होणार आहे असेही काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले.