मुंबई, दि. २५ (पीसीबी) – शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. पण आता बंडखोरांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांना समन्स बजावला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे संघर्ष आता कायदेशीर पेच प्रसंगात अडकला आहे. शिवसेनेनं या बंडखोर आमदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांना समन्स बजावला आहे. एवढंच नाहीतर 16 आमदारांना आज 5 वाजेपर्यंत नोटीस दिली जाणार आहे. मेलद्वारे नोटीस पाठवली जात आहे.आतापर्यंत 6 आमदारांना नोटीस पाठविण्यात आले आहे. लेखी पत्र आमदारांच्या घरी पाठवण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, बंड पुकारल्यानंतर पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांचं गटनेतेपद काढून घेतलं, त्यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांना नोटीस पाठवली होती. या नोटीसीनुसार, २२ जून रोजी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले होते. पण, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात केली आणि सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असा दावा केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीला एकनाथ शिंदे कसं उत्तर देता हे पाहण्याचे ठरणार आहे.











































