आचार्य प्र. के. अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना जाहीर

0
324

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – कवी, लेखक, राजकारणी व ज्येष्ठ पत्रकार असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या नावाने पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना “आचार्य प्र. के. अत्रे पुरस्कार २०२२” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी (२५ जून ) सकाळी अकरा वाजता पिंपरी, काळेवाडी येथील हॉटेल कुणाल (फंक्शन हॉल) येथे आयोजित कार्यक्रमास पत्रकार बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव यांनी केले आहे.

सत्कारमूर्ती विजय भोसले हे दैनिक केसरीचे पिंपरी चिंचवडचे आवृत्ती प्रमुख असून मागील ४१ वर्षांपासून ते कार्यरत आहेत. त्यांचे मुंबई अधिवेशन, नागपूर अधिवेशन वार्तांकन महाराष्ट्रात मोठ्या आवडीने वाचले जाते. ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात लाखो नियमित वाचक आहेत. भोसले यांनी एलआयसीच्या आयपीओ बाबत केलेले वृत्तांकन लाखो लोकांनी वाचले. मराठी पत्रकार क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्यासाठी ते एक चालते बोलते व्यासपीठ समजले जाते.

आजही प्रसारमध्यमातील अनेक पत्रकार त्यांचे मार्गदर्शन घेताना आढळतात. मंत्रालय, विधिमंडळ प्रतिनिधी म्हणून ते गेली 32 वर्षे नियमित काम करीत आहेत. शहरातील, राज्यातील राजकारण, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचा सखोल अभ्यास असून त्या विरोधी त्यांनी केलेले लिखाण राज्यभर गाजले आहे.

मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संघटनेला संलग्न झालेल्या पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच राज्य संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली झाली. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना प्र. के. अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्याचे बहुमताने मंजूर करण्यात आले. शनिवारी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.