शिवसेनेच्या आमदाराला ५० कोटींची ऑफर होती, पण…

0
257

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – शिवसेना आमदार फोडण्यासाठी तब्बल ५० कोटींची ऑफर होती, असा दावा आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. आपल्याला ५० कोटींची ऑफर होती पण ती स्विकारली नाही, वर्षावरच थांबलो, असे आपल्या कार्यकर्त्याबरोबर ते बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

आपल्या कार्यकर्त्याशी बोलताना आमदार राजपूत म्हणतात,
आपल्याला ५० कोटी देत होते, पण पैशाचे काय करतो, मला माझे जीवन सुखी राहण्याशी मतलब आहे. मी उध्दव ठाकरेंच्या बरोबरच आहे, सद्या वर्षावर आहे.

आमदारांच्या या संवादवर त्यांचा कार्यकर्ता त्यांचे अभिनंदन करतो आणि तुमचा निर्णय एकदम योग्य आहे, आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे सांगतो. आमदार राजपूत यांचा हा संवाद सद्या सर्व मीडियातून फिरतो आहे.

शिवेसेनेचे ५५ पैकी तब्बल ४१ आमदार कसे फुटले याचे कोडे कोणालाच उलगडले नाही. सुरवातीला २० नंतर ३० असे करत हा आकडा तब्बल ४१ पर्यंत गेला. जे मंत्री, आमदार दोन दिवस उध्दव ठाकरे यांच्या बरोबर होते, बैठकांमध्ये सहभागी झाले होते ते सुध्दा अचानाक रातोरात नॉट रिचेबल झाले आणि दुसऱ्या दिवशी गुवाहाटीत असल्याच्या बातम्या झळकल्या. हे परिवर्तन कसे झाले याबाबत सर्वांना संशय आहे. भाजपाने शिवेसेना फोडण्यासाठी मोठी ताकद लावल्याचे सांगितले जात होते, पण त्याबाबतचे पुरावे मिळत नव्हते. आमदार राजपूत यांनी स्वतःच आपल्याला ५० कोटींची ऑफर होती, असे अगदी प्रांजळपणे संवादात म्हटल्याने आता संशयाचे धूके दाट झाले आहे.