…अशाप्रकारे निलंबन करण्याचा अधिकारच नाही – एकनाथ शिंदे

0
189

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) : शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. यादरम्यान आणखी काही आमदार, खासदार तसंच नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याची माहिती आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रक्रिया दिली आहे.

“आमची बैठक होणार असून पुढील रणनीती ठरवली जाईल. आम्ही बहुमताची संख्या पार केली आहे. अपक्ष आमदारदेखील आमच्यासोबत आहेत. तांत्रिक, कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सत्तास्थापनेसंदर्भात आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

“अशाप्रकारे निलंबन करण्याचा अधिकारच नाही. आमच्याकडे बहुमत असताना अशी कारवाई होऊ शकत नाही. बैठकीला हजेरी लावली नाही म्हणून अपात्र ठरवणं हे तर देशातील पहिलं उदाहरण ठरेल. जो अधिकारच नाही तो बजावता येणार नाही. या देशात कायदा, राज्यघटना आहे त्याप्रमाणेच चालावं लागेल. वाटेल तसं वागता येणार नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी अपात्र ठरवण्याच्या मागणीवरील याचिकेवर बोलताना सांगितलं.

पक्ष चिन्हावर दावा केला जात असून खरी शिवसेना कोणती? उद्धव ठाकरेंची की तुमच्यासोबत असलेल्या आमदारांची असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “असा कोणताही दावा आम्ही केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक असून आमच्याकडे बहुमत आहे. बैठकीनंतर गोष्टी स्पष्ट होतील”.

शरद पवारांनी पुन्हा यावंच लागेल असा इशारा दिल्यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “शरद पवार मोठे नेते आहेत. आम्ही त्यांचा आदरच करतो. पण लोकशाहीत संख्या महत्वाची असते. कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे आहे तेच करावं लागतं. आमची बाजू भक्कम आहे”. “बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ही महाशक्ती आमच्यामागे असून, त्यांचे आशिर्वाद आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.