प्रतोद सुनील प्रभू यांचे पत्र बेकायदा असल्याचा शिंदे यांचा दावा

0
227

– शिवसेना प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्तीसुध्दा वादात

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यानुसार मुख्य विधीमडळातील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना आजच्या बैठकीला हजर राहण्यासाठी व्हीप काढला आहे. पण हा व्हीप एकनाथ शिंदे यांनी झुगारून लावत प्रभू यांचीच उचलबांगडी केली आहे. त्यांच्याजागी विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरुध्द एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता टीपेला गेल्याचे पहायला मिळते. ठाकरे यांनी गटनेतेपदावरुन शिंदे यांना बाजुला करून अजय चौधरी यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केलेली असल्याने आता सर्व अधिकार चौधरी यांना असल्याने
मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची शिंदे यांनी केलेली नियुक्त कितपत ग्राह्य ठरते याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. शिंदे यांनी प्रभू यांच्याजागी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. ‘शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत,’ असं शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गटनेते पदावरून हटवल्यानंतरही हा निर्णय़ बेकायदेशीर असल्याचे शिंदे यांनी म्हटलं होतं. आपल्याकडे बहुमत असल्याने असा निर्णय घेता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी प्रभू यांनी काढलेल्या व्हीपलाही आव्हान दिलं आहे. आपल्याकडील आमदारांच्या बहुमताच्या जोरावर त्यांनी प्रभूंना पदावरून हटवत थेट मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान दिले आहे.

प्रभू यांनी काढलेल्या व्हीपमध्ये?
पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. 22 जून रोजी वर्षा बंगला येथे सायंकाळी पाच वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस उपस्थिती आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी, असं प्रभू यांनी म्हटलं आहे.

ही सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठविली आहे. त्याव्यतिरिक्त आपण समाजमाध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस. एम. एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरूपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर राहता येणार नाही, असे नोटिशीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल जाले आहेत. आपल्यासोबत अपक्षांसह शिवसेनेचे 46 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिुंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाण्याचे ठरवले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मागील अडीच वर्षांपासून आमदारांच्या मनात खदखद सुरू होती. आता निर्णय घेण्याची वेळ आल्याचे आमदारांना वाटले, त्यामुळे हा निर्णय़ घेतल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.