पिंपरी, दि.२२(पीसीबी) – आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांचा मेळा ज्ञानोबा – तुकाराम असा जयघोष करत आणि टाळ – मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आज पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत आगमन झाल्यानंतर शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांचे महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी दिंडी प्रमुखांना पुष्पहार आणि श्रीफळ देऊन स्वागत करुन त्यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रथमोपचार पेटी, महापालिका प्रशासन आणि त्यांचे संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका, मूल्यशिक्षण अभ्यासपुस्तिका दिंडी प्रमुखांना भेट देण्यात आली.
दिघी मॅगझिन चौक येथे झालेल्या पालखी सोहळ्याच्या स्वागतावेळी पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता संदेश चव्हाण, उप आयुक्त विठ्ठल जोशी, सचिन ढोले, रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता किशोर महाजन, माणिक चव्हाण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, बाळासाहेब खांडेकर, उमाकांत गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, संतपिठाच्या संचालिका स्वाती मुळे, संचालक राजु महाराज ढोरे, प्राचार्या डॉ. मृदुला महाजन यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह मोहिम सुरु असून प्लास्टिकमुक्त वारीची संकल्पना देखील राबवली जात आहे. त्यादृष्टीने माहिती देण्यासाठी महापालिकेने चित्ररथ तयार केला आहे. या रथाद्वारे स्वच्छतेविषयक जनजागृती केली जात आहे. 360 अंशात गोलाकार फिरणाऱा सेल्फी पॉइंट महापालिकेने मॅगेझिन चौकात उभारला होता. मी स्वच्छाग्रही, प्लास्टिक वापरणार नाही, स्वच्छता मोहिमेत सहभाग घेईल, मी परिसर स्वच्छ ठेवेल असे विविध संदेश या सेल्फी पॉइंटद्वारे देण्यात आले.
दरम्यान, दिघी मॅगझिन चौक या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पालखीचे चित्र डोळ्यासमोर उभे करणारे सुंदर शिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पाचे उद्घाटन आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डोक्यावर टोपी आणि खांद्यावर पालखी आणि विणेकरी, टाळ – मृदुंग वादकांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहे.
पालखीच्या स्वागताच्या ठिकाणी मॅगेझिन चौक येथे कक्ष, स्वागत कमान उभारण्यात आली होती.शिवाय या ठिकाणी कंट्रोल रूम तयार करुन आपत्तीविषयी नियंत्रणाचे काम या तेथे केले जात होते. या चौकात विठ्ठलाच्या प्रतिमेचे कटआऊट्स लावण्यात आले होते. त्यावर केलेली केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विसाव्याच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड शहरातून आज पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला.