आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक … शिवसेनेनं गटनेतेपदावरून काढल्यानंतर एकनाथ शिंदेंचं ट्वीट

0
229

मुंबई दि. २१(पीसीबी) – विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.  बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आल्याचं कळतं आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतृत्वाने मोठा धक्का दिला आहे.  यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केलं आहे.

‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.”, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.शिवसेनेतील आजवरचे हे सर्वात मोठं बंड असणार आहे. एकाच वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.