उद्धव ठाकरे झाले आक्रमक…! शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी

0
215

मुंबई दि. २१(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आता आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा अर्थ शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बोलणी फिस्टकली आहेत, असाही घेतला जात आहे. ठाकरे हे आता शिवसेना भवनात जाऊन शिवसैनिकांशी बोलणार आहेत. तेथे ठाकरे काय भूमिका काय घेणार, यावर एकनाथ शिंदे आपले धोरण ठरविणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपण सत्तेसाठी प्रतारणा करणार नसल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटवरून शिवसेनेचे नाव हटविल्याचे सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार वाचणार का, या प्रश्नावर पवार यांनी सरकार स्थिर असल्याचा दावा केला. शिंदे यांचे बंड शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. उद्धव ठाकरे हे यातून मार्ग काढतील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बदल करण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांत पवार यांचा निर्वाळा. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा आहे, हे मला नव्यानेच कळत आहे, अशीही भूमिका पवार यांनी मांडली. कोणाला कोणत्या पदावर ठेवायचे, हा ठाकरे यांचा निर्णय असेल. त्याला आम्ही सहमत असू असाही निर्वाळा पवार यांनी दिला. शिवसेनेला एकनाथ शिंदेंशी चर्चा करू द्या, त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू, असेही पवार यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर आता शरद पवार हे रिंगणात उतरले आहेत. ठाकरे सरकार स्थापनेच्या वेळेपासूनचे हे तिसरे बंड असल्याचे पवार यांनी सांगितले. सरकार स्थापनेच्या वेळी देखील हरियाणात काही आमदार ठेवण्यात आले होते, अशी आठवण पवार यांनी सांगितली. विधान परिषदेच्या निकालावर बोलताना पवार म्हणाले की महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला. हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी काॅंग्रेसची होती, असेही पवार यांनी सांगितले.