चाकण येथे १०० खाटांचे कामगार विमा रुग्णालय (ESIC) उभारण्यास मंजुरी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

0
239

पिंपरी दि. २१ (पीसीबी) – चाकण येथे १०० खाटांचे कामगार विमा रुग्णालय (ESIC) उभारण्यास ईएसआय कॉर्पोरेशनच्या काल झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, या निर्णयाचे स्वागत करीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय श्रममंत्री भुपेन्द्र यादव यांचे आभार मानले आहेत.

चाकण एमआयडीसी क्षेत्रात शेकडो कंपन्या उभ्या राहिल्या. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ‘ईएसआय’ची रक्कम कापून घेतली जात होती. परंतु कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरात किंवा खासगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे चाकण येथे कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभारण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय श्रममंत्री भुपेन्द्र यादव यांनी प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पत्र खासदार डॉ. कोल्हे यांना पाठवले होते.

काल श्रममंत्री यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ईएसआय कॉर्पोरेशन, पर्यावरण आणि हवामान बदलाच्या १८८ व्या बैठकीत महाराष्ट्रातील चाकण, पालघर, सातारा, पेण, जळगाव आणि पनवेलसह देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे चाकण एमआयडीसी क्षेत्रातील लाखों कामगारांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून खासदार डॉ. कोल्हे यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे मागील अनेक वर्षांपासूनची कामगारांची मागणी पूर्ण होणार आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, चाकण एमआयडीसीची निर्मिती होऊन १५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांच्या वेतनातून दरमहा कोट्यवधी रुपये ईएसआय कार्पोरेशनकडे जमा होतात. मात्र त्या बदल्यात कामगारांना स्थानिक स्तरावर ईएसआय रुग्णालयाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कोविड साथीच्या काळात कामगारांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे चाकण, रांजणगाव, तळेगाव या सर्व एमआयडीसीतील कामगारांसाठी मध्यवर्ती अशा चाकण परिसरात कामगार विमा रुग्णालय आवश्यक आहे. या विचारातूनच मी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या श्रममंत्रालयाकडे पाठपुरावा करीत होतो.

राज्याचे तत्कालिन कामगारमंत्री व सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही ही गरज ओळखून माझ्या मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय श्रममंत्रालयाकडे चाकण येथे कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत मी मागील लोकसभा अधिवेशनादरम्यान श्रममंत्री भुपेन्द्र यादव यांची भेट घेतली होती. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार काल ईएसआय कॉर्पोरेशनच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली.

खासदारपदी निवड झाल्यापासून सातत्याने जनतेशी निगडीत प्रश्न सोडविण्याला व प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र त्याचबरोबर नवीन प्रकल्प मंजूर व्हावे यासाठीही नियोजनबद्ध प्रयत्न सुरू होते. त्यामुळेच ‘इंद्रायणी मेडिसिटी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापाठोपाठ चाकण येथे कामगार विमा योजनेचे रुग्णालय मंजूर होत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय श्रममंत्री भुपेन्द्र यादव तसेच गृहमंत्री वळसे पाटील यांचे खासदार डॉ. कोल्हे यांनी आभार व्यक्त केले.