आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्रात ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडतील – महेश लांडगे

0
274

पिंपरी दि. १८(पीसीबी)
– राज्यात महापालिका क्रीडा धोरण पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदा राबवण्यात आले. त्याचे अनुकरण अन्य महापालिकांनी केले आहे. त्यामुळे प्रशासनाने पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे कामकाज करीत असताना राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेले स्थानिक खेळाडू, प्रशिक्षकांच्या अनुभवाचा फायदा करुन घ्यावा. शहरातील गरीब खेळाडुंना संधी मिळाली पाहिजे. या कुस्ती केंद्रात ऑलिम्पिकच्या तयारीचे क्रीडापटू तयार होतील, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

महापालिका ई-क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने भोसरीतील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, ई-क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान नरसिंग यादव, पै. अजय लांडगे, पै. किशोर नखाते यांच्यासह क्रीडा, स्थापत्य आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केलेल्या स्थानिक पैलवान, प्रशिक्षकांच्या अनुभवाचा या केंद्राच्या कामकाजात फायदा करुन घ्यावा. राज्यातील महापालिकांमध्ये पहिल्यांदा पिंपरी-चिंचवड महापालिकेने क्रीडा धोरण केले. त्याचे अनुकरण अन्य महापालिकांनी केले आहे. राजकीय हस्तक्षेप विरहीत कामकाज आणि ऑलिम्पिकच्या तयारीचे खेडाळू शहरात घडले पाहिजे.
आंतरराष्ट्रीय संकुल कसे असावे? यासाठी मागील काही दिवसापूर्वी पालिकेने नामंकित संस्था आणि पैलवान संकुल पाहणीसाठी बोलावले होते. गेल्या पाच वर्षांत कुस्ती केंद्राचे काम पूर्ण झाले. हे केंद्र आता कार्यान्वयीत होत आहे. आगामी काळात ‘साई ’संस्थेच्या नियमांच्या धर्तीवर कुस्ती केंद्रासाठी नियमावली तयार करावी. व्यावसायिक आणि आर्थिक लाभाच्या आमिषांना बळी न पडला चांगले खेळाडू कसे तयार होतील, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमताने काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केली.

‘सीएसआर ’ फंडातून कुस्ती केंद्र चालवू : आमदार लांडगे

प्रशासनाने कुस्ती केंद्राच्या कामकाजासाठी वर्षाला किती खर्च येईल? याचे बजेट तयार करावे. सीएसआर अर्थात कंपनी सोशल रिस्पॉसिबिटिटी फंडच्या माध्यातून केंद्र चालवण्यासाठी विचार करावा. त्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील. महापालिका आणि सीएसआर फंडातून राज्यात लक्षवेधी क्रीडा संकूल चालवता येईल. या ठिकाणी येणाऱ्या खेळाडुंना सर्व व्यवस्था मोफत असेल. तसेच, शाळा आणि रुग्णालयाचीही व्यवस्था करता येईल. कुस्ती संकुलाच्या प्रभावी संचालनासाठी एखाद्या नामांकीत संस्थेची नेमणूक करता येईल, असेही आमदार लांडगे म्हणाले. तसेच, मॅट, आखाडा, प्रशिक्षण नियुक्ती, व्यायाम साहित्य, निवास व्यवस्था, स्वच्छता आदी विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.