अग्निपथ योजनेमुळे नैराश्यात येऊन तरुणाची आत्महत्या…

0
240

देश,दि.१७(पीसीबी) – भारतीय सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धनंजय मोहन्ती असे त्या युवकाचे नाव असून तो ओडिशातील बालासोरे जिल्ह्यातल्या तेन्तेई या गावातील रहिवासी आहे. केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजनेमुळे भारतीय सैन्य भरतीची लेखी परीक्षा रद्द केली. त्यामुळे नैराश्यात येऊन आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप धनंजयच्या कुटुंबीयांनी केला आहे.

धनंजयचा मित्र प्रतिभास राजने माध्यमांशी बोलताना सांगितले, की धनंजय गेली ४ वर्ष सैन्य भरतीची तयारी करत होता. दीड वर्षांपूर्वी त्याने शाररीक क्षमतेची चाचणी पार केली होती. परंतु करोनामुळे लेखी परीक्षा पुढे ढकलली जात होती. आता केंद्र सरकारने अग्निपथ योजनेमुळे ही लेखी परीक्षा रद्द केली आहे. आम्ही आता परिक्षेसाठी पात्रता वयोमर्यादाही ओलांडली असल्याचेही प्रतिभास म्हणाला.

तसेच परीक्षा रद्द झाल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकत्त्यामधल्या अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याची बातमी धनंजयला व्हॉटसद्वारे कळाली. या सगळ्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. एवढचं नाही तर आत्महत्या करण्याअगोदर त्याने त्याच्या मित्रांना एक मेसेज पाठवला होता, की सरकारवर विश्वास ठेवू नका आणि कधीही त्यांना मतदान करु नका.असे त्यात लिहले होते.

‘अग्निपथ’ योजनेंतर्गत चार वर्षांसाठी ‘अग्निवीरां’ची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली होती. त्यानंतर देशभरात या योजनेविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. या अंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. त्याचे लोण गुरुवारी उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले. उत्तर प्रदेशातील बलियामध्ये जमावाने ट्रेनला आग लावली आहे. पोलिसांना पांगवण्याआधी आंदोलकांनी स्थानकावर उभ्या ट्रेनवर हल्ला करत तोडफोड केली. स्थानकावरील संपत्तीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. भाजपाची सत्ता असणाऱ्या हरियाणा आणि मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात या योजनेला विरोध करण्यात येत आहे.