पिंपरी, दि.१६ (पीसीबी) – “हरित वसुंधरेच्या बोधचिन्हातून शहराची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे!” असे गौरवोद्गार लायन्स क्लब इंटरनॅशनलचे पुणे जिल्हा प्रांतपाल हेमंत नाईक यांनी आकुर्डी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक १६ जून २०२२ रोजी काढले. आकुर्डी रेल्वेस्थानकाकडून डॉ. डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकात वाहतूक बेटाचे (ट्रॅफिक आयलंड) हरित वसुंधरा बोधचिन्ह उभारून लायन्स क्लब ऑफ पूना निगडी यांच्यावतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. प्रांतपाल हेमंत नाईक आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सुशोभीकरण प्रकल्पाची परवानगी ते पूर्णत्व यासाठी समन्वयाची महत्त्वाची भूमिका पार पाडणारे सलीम शिकलगार, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे विभागीय अध्यक्ष हर्ष नायर, जयंत मांडे, दिलीपसिंह मोहिते, प्रशांत कुलकर्णी, हरिदास नायर, सुदाम मोरे, प्रवीण शेलार, दिलीप गायकवाड, अरुण थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे अध्यक्ष रामकृष्ण मंत्री यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी शैलजा मोरे म्हणाल्या की, “लायन्स क्लब ऑफ पूना निगडी यांच्या सभासदांनी स्वतः पदरमोड करून आणि लोकसहभागातून उभारलेले हरित वसुंधरा शिल्प, त्याभोवती केलेले वृक्षारोपण, आकर्षक विद्युत रोषणाई अन् सुशोभीकरण हे पिंपरी-चिंचवड महापालिका, आपलं पिंपरी-चिंचवड, आपलं प्राधिकरण यांच्या माध्यमातून नागरिकांच्या सकारात्मक मानसिकतेचे सुखद दर्शन घडविणारे आहे!” सलीम शिकलगार यांनी प्रास्ताविकातून, “पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी या चौकाचे सुशोभीकरण करण्याची परवानगी दिली होती.
त्यानंतर लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या सभासदांनी आपले घरचे कार्य समजून या कामासाठी तन, मन, धन समर्पित केले. परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला; तसेच आयुक्त कार्यालय, विद्युत विभाग, उद्यान विभाग, बीआरटी विभाग आणि विशेषतः बीआरटीमधील अधिकारी सुनील पवार यांच्या अमूल्य सहकार्याने अल्पावधीतच हे कार्य अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे पूर्णत्वास गेले!” अशी माहिती दिली. यावेळी सुशोभीकरण प्रकल्पाचे विनामूल्य आरेखन करणारे वास्तुविशारद (आर्किटेक्ट) उदय कुलकर्णी आणि उत्कर्षा कुलकर्णी यांचा खास सन्मान करण्यात आला. तसेच सुशोभीकरणासाठी परिश्रम घेणाऱ्या चंद्रशेखर पवार, मारुती मुसमाडे, देवीदास ढमे, जयश्री मांडे, मनीषा गायकवाड, भाग्यश्री पवार, नसीमा शिकलगार, सविता निंबाळकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हृषीकेश मुसमाडे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक येवले यांनी आभार मानले.