प्रोटोकॉल देवेंद्र फडणवीस आणि आचार्य तुषार भोसले यांनी बदलला

0
416

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन झालेला कालचा (ता.१४ जून ) देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानच्या शिळा मंदिर उदघाटनाचा कार्यक्रम हा प्रोटोकॉल न पाळल्याने वादग्रस्त ठरला. त्याला स्थानिक शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे अनुपस्थित होते. तर, उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही. त्यावर हा प्रोटोकॉल भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी बदलण्याचा उपद्वाप केला, असा हल्लाबोल स्थानिक आमदार मावळचे राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी आज (ता.15 जून) केला. तसेच हा सोहळा भाजप पुरस्कृत होता, असा दावाही त्यांनी केला.

देहू संस्थानच्या कालच्या या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. स्थानिक खासदार, आमदार व देहू नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचे नाव व्यासपीठावर बसणाऱ्या व्यक्तींच्या यादीत देहूच्या विश्वस्तांनी देऊनही हा प्रोटोकॉल बदलीत, त्यांना डावलण्यात आले, असा आरोप शेळकेंनी केला. हा कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचा होता. वारकऱ्यांनाही त्यापासून लांब ठेवून त्यांचा अपमान करण्यात आला. वारकरी संप्रदायाला वेठीस धरण्यात आले. त्यांना सन्मान दिला नाही.

त्यातून ते दुखावले गेले. त्यामुळे त्याचा जाहीर निषेध करतो, असे ते यावेळी म्हणाले. देहू संस्थानचे काही विश्वस्त हे राजकारण करीत आहेत, असा आऱोपही त्यांनी केला. पवारांवर बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आचार्य भोसले हे देहूच्या कार्यक्रमाचे प्रमुख असल्याचे समजताच त्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला गालबोट लागणार नाही, याची दक्षताही घेतली. तसेच नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने या दौऱ्यासाठी स्वच्छता करण्याचे काम, मात्र राजकारण बाजूला ठेवून केले, असे त्यांनी स्पष्ट केले.