विधवांनी साजरी केली वटपौर्णिमा

0
326

अकोला, दि. १५ (पीसीबी) – समाजाती अनिष्ट, रुढी, परंपरांना झुगारत अकोल्यात विधवांनी वटपौर्णिमा साजरी करत वडाच्या झाडाचे पूजन केलं. वटपूजन करताना अनेक महिला भावूक झाल्या होत्या. तर काहींना अश्रू अनावर झाले होते.

आजही विधवांना प्रथमतः घरातून आणि समाजातून अनेक मर्यादांना सामोरे जावे लागते. आजही विधवांचे वटपौर्णिमा पूजन समाजात मान्य नाही. त्यामुळे या महिला वड पूजनासाठी पुढाकार घेत नाहीत किंवा त्यांना घेऊ दिला जात नाही. अशा गंभीर परिस्थितीत अकोल्यात वीरस्त्री स्व. लताताई देशमुख प्रेरीत स्वामिनी विधवा विकास मंडळाने समाजातील या प्रवाहाविरुद्ध लढा दिला अन् या अनोख्या उपक्रमाला सुरूवात केली. ही संस्था गेल्या १२ वर्षापासून विधवा महिलांसाठी वटपौर्णिमा पूजनाचे आयोजन करीत आहे.

विधवांच्या सन्मानार्थ झालेल्या वट पूजनासाठी स्वामिनीच्या सचिव सुनिता डाबेराव व जिल्हाध्यक्षा साधना पाटिल यांच्या नेतृत्वात अनेक महिलांनी पुढाकार घेतला अन् वटपौर्णिमा पूजन करुन विधवांना शुभेच्छा दिल्या.

समाजातून मान्यता नसताना सुद्धा अनिष्ट सामाजिक बंधनांना झुगारत सुरू असलेल्या या समाज सुधारणेबाबत उपस्थित विधवा महिलांनी यावेळी आभार व्यक्त केले. या दरम्यान, अनेक विधवा वडपूजन करताना भावूक झाल्या होत्या.

अकोल्याचा स्वामिनी पॅटर्न राज्यभर राबवून याला कायदेशीर मान्यता दिल्यास या विधवा महिलांवरील सामाजिक दडपण नक्कीच दूर होईल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष संजय कमल अशोक यांनी व्यक्त केला. यावेळी विधवांनी आपले मनोगत व्यक्त करुन स्वामिनी संघटनेने समाजाकडे लक्ष न देता परंपरा कायम ठेवावी आणि शासनाकडे पाठपुरावा करावा, असा आग्रह धरलाय.