पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बोगस प्रमाणपत्र देणा-या दोन कर्मचा-यांची, नेमून न केल्यामुळे एका मजुराची आणि विना परवाना सुट्या घेतल्यामुळे एक अशा चौघांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली. विनापरवाना गैरहजर राहणा-या कर्मचा-याची वेतनवाढही रोखली. या आदेशाची चौघांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
निलेश शंकर बिर्दा आणि सचिन बाळकृष्ण परदेशी हे दोघेही महापालिकेमध्ये मजुर या पदावर कार्यरत आहेत. बिर्दा आणि परदेशी हे अनुसूचित जाती प्रवर्गातून महापालिका सेवेत रुजू झाले होते. त्यांनी महापालिकेला सादर केलेल्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने जिल्हा जात पडताळणी समितीनेकडे बिर्दा आणि परदेशी यांचे जात प्रमाणपत्र पाठविले होते. समितीने बिर्दा, परदेशी यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरविले असून तसा अहवाल महापालिकेला दिला आहे. त्यानुसार या दोघांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.
नाशिक फाटा ते लांडेवाडी रोड या भागात 5 मार्च 2022 रोजी प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत ह क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य विभागात सिताराम दत्तात्रय कसाळे हे मजूर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 5 मार्च रोजी नालेसफाईचा कोणताही आदेश नसताना आणि सुरक्षा साधनांचा वापर न करता नालेसफाईचे काम त्यांनी केले. त्यांनी कोणतीच सुरक्षेची साधने न घालता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही. याबाबतची महापालिकेला फोटोसह ई-मेलवर तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून कसाळे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
अभिजीत तुकाराम कापसे हे महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयात मजूर म्हणून कार्यरत आहे. मात्र, त्यांनी 2 सप्टेंबर 2014 ते 28 मे 2018 या कालावधीत तब्बल 1 हजार 333 विना परवाना सुट्या घेतल्या होत्या. त्यामुळे कापसे यांची विभागाअंतर्गत खातेनिहाय चौकशी करण्यात आली. यामध्ये कापसे यांनी विना परवाना गैरहजर राहून कर्तव्याचे पालन न केल्याचे आढळून आले आहे. त्यांची भविष्यातील एक वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. तसेच भविष्यात विना परवाना गैरहजर राहिल्यास किंवा कर्तव्यात कसूर केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.