खासदार बारणे, आमदार शेळके यांनाही डावलले

0
563

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहुमध्ये संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम देहू संस्थानचा असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधिंना निमंत्रण नसल्यामुळे त्यावरुन आर्श्चय व्यक्त होत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना निमंत्रण नव्हते. या दोघांच्या मतदारसंघात हा कार्यक्रमात होता. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले मोदी यांच्या रांगेत उपस्थित होते.

दरम्यान, उपस्थितांचा नामोल्लेख सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर एकही टाळी पडली नाही, मात्र मोदी व फडणवीस यांच्या नावाला टाळ्यांचा कडकडाट झाल्याने समोर उपस्थितांमध्ये वारकरी, टाळकरी नव्हे तर वारकऱ्यांच्या गणवेशात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेच उपस्थित होते, असे निदर्शनास आले.

याविषयी ‘पीसीबी टुडे` बोलताना बारणे म्हणाले, “मी संत तुकाराम महाराजांचा भक्त आहे. पदावर नसल्यापासून मी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतो. या कार्यक्रमाला मला जायला आवडले असते. हा देहू संस्थानचा कार्यक्रम होता. पण भाजपने तो कार्यक्रम आयोजित केला आहे, असे चित्र निर्माण झाले. यामध्ये पक्षीय राजकारण करणे योग्य नव्हते. या कार्यक्रमापासून स्थानिक प्रतिनिधींना दूर ठेवणे योग्य नव्हते. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असूनही निमंत्रण नसल्याने मला जाता आले नाही. माझी कोणावरही नाराजी नाही, पण भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केला.“ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तरी भाषणासाठी कोठे संधी दिली, असाही सवाल बारणे यांनी केला.