अनधिकृत फ्लेक्‍सबाबत “या” क्रमांकावर तक्रार करा; महापालिकेचे आवाहन

0
230

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध भागातील इच्छुकांकडून जोरदार फलकबाजी सुरू आहे. यातील बहुतेक फलक हे विनापरवाना आहेत. त्यामुळे शहर विद्रपीकरणास चाप बसण्यासाठी विनापरवाना फ्लेक्‍स दिसल्यास नागरिकांनी 67333333 विस्तार 1122 व टोल फ्री 8888006666 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन आकाश चिन्ह विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाढदिवस, धार्मिक, सामाजिक किंवा अन्य कोणताही कार्यक्रम असो जाहिरात फलक लावण्याची एक फॅशनच झाली आहे. मात्र, अधिकृत परवाना घेऊन फ्लेक्‍स लावण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या विविध प्रभागातील इच्छूक सक्रीय झाले आहेत. शहरातील मुख्य चौकासह गल्लीबोळात परवानगी न घेता अनेकजण फ्लेक्‍सबाजी करत आहेत.

अशा विना परवाना फ्लेक्‍सवर नुकतीच महापालिकेने एक मोहिम राबवत कारवाई केली आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील विविध भागात विना परवाना फ्लेक्‍सबाजी करून शहर विद्रुप करण्याचा अनेकांकडून प्रयत्न होत आहे. या विद्रुपीकरणाला चाप बसावा, यासाठी आता पालिकेने दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. शहरात विना परवाना फ्लेक्‍सबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्रमाकांवर तक्रार करावी, असे आवाहन आकाश चिन्ह विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.