`वा लक्ष्मण वा…` फडणवीसांचे बोल काय सांगतात…थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
540

राज्यसभा निवडणुकीत भाजपाने महाआघाडीला चितपट केले. अपक्ष आमदारांची मते पध्दतशीर वळवली, महाआघाडीची आणि त्यातल्या त्यात शिवसेनेची पूरती जिरवली. निवडणुकित शिवसेनेची तोफ असलेले संजय राऊत थोडक्यात बचावले. ते जिंकले पण त्यांच्या विजयापेक्षा संजय पवार यांचा दारुण पराभव अधिक चर्चीला गेला. भाजपाचे धनंजय महाडिक जिंकले, कारण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांची व्युहरचना. राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि काँग्रेसचे पटोले-थोरात या दिग्गजांना एकटे देवेंद्र फडणवीस पुरूण उरले. राज्याच्या राजकारणातील ही एतिहासिक निवडणूक ठरली. आगामी राजकारणाची दिशाही स्पष्ट झाली. संजय राऊत यांनी फुटीर अपक्षांची नावे जाहिर केली आणि नको ती नाराजी ओढावून घेतली. दुसरीकडे मुरब्बी शरद पवार यांनी `मला त्याचे आश्चर्य वाटले नाही`, अशी अत्यंत मार्मिक प्रतिक्रीया दिली. खरे तर, शरद पवार यांच्या त्या विधानात खूप मोठा गर्भीत अर्थ दडलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत विनम्रपणे भाजपाच्या विजयावर भाष्य केले, तेच सर्वांना खूप भावले. धनंजय महाडिक यांचा विजय त्यांनी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पीत केला. सगळ्या लढाईचे श्रेय लढवय्ये आमदार जगताप यांना दिले. महाराष्ट्राला फडणवीस यांचा मनाचा मोठेपण दिसला. गेले दोन महिने अंथरूणाला खिळून असलेले, अक्षरश मृत्यूशी दोन हात करुन आयुष्याची लढाई जिंकलेले आमदार जगताप यांचे सर्वांनाच कौतुक आहे. त्याची जीद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीला सलाम. राज्यसभेच्या अटीतटीच्या लढतीत पक्षाचा आदेश म्हणून जीव धोक्यात घालून आमदार जगताप मतदानासाठी आले होते. घराबाहेर न पडण्याचा डॉक्टरांचा सल्ला असताना कार्डेक एम्बुलन्समधून तीन तास प्रवास करून ते विधानभवनात मतदानासाठी आले. फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात `वा लक्ष्मण वा…`म्हणत कौतुक केले. उभ्या महाराष्ट्राने आमदार जगताप यांचे भाजपा प्रेम पाहिले. निकालानंतर फडणवीस यांनी ज्या पध्दतीने आमदार जगताप यांचा उल्लेख केला त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आता यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकित जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्याच हातात सर्व सूत्रे असणार आहेत. स्वतः फडणवीस पुन्हा पिंपरी चिंचवडची लढत प्रतिष्ठेची करणार. राज्यसभेसाठी शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे रथीमहारथी समोर असताना एकट्या फडणवीस यांनी हे मैदान मारले. विजयाची शृंखला सुरू झाल्याचे फडणवीस सांगतात. याचा अर्थ २० जूनला होणाऱ्या विधान परिषदेसाठीही भाजपा पाचही जागा जिंकू शकते. राज्यसभेला अर्धी लढाई जिंकली आता विधानपरिषद, नंतर महापालिकांनाही त्या विजयाची पुनरावृत्ती होणार. महाआघाडीतील गोंधळ, समन्वयाचा अभाव, एकमेकांवर होणारे आरोप- प्रत्यारोप पाहिले की लोक सहजच `फडणवीस परवडले`, असे बोलून जातात. सर्व घडामोडी सुरू असताना `उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा भाजपामध्ये यावे`, अशी ऑफर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देतात, इथेच कुठेतरी पाणी मुरते. स्वतः अजित पवार याविषयावर एक शब्द न बोलता मौन धारण करून आहेत. राज्याच्या राजकारणात जी काही उलथापालथ सुरू आहे त्यात महाआघाडी सरकारची सत्वपरिक्षा सुरू आहे. राष्ट्रपती निवडणुकीत शरद पवार यांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत येण्याला आणि काँग्रेसने तत्काळ त्यांच्या नावाला पाठिंबा देण्यामागेही वेगळेच काही तरी घाटत असल्याचा वास येतो. ईडी, सीबीआय, आयटी चा अगदी पध्दतशीर वापर केंद्राच्या मदतीने सुरू आहे. आता परिषदेलाही त्याच तिकीटावर तोच खेळ रंगणार आहे.

आमदार जगताप, लांडगे आणि आता खापरे –
पिंपरी चिंचवड शहरात पवार यांच्या साम्राज्याला धक्का देत भाजपाची सत्ता आली. खरे तर, त्याचे सगळे श्रेय आमदार जगताप आणि महेश लांडगे यांना जाते. आता त्यांच्या जोडीला भाजपाच्या तिसऱ्या आमदार उमा खापरे यांची भर पडणार आहे. खापरे या निष्ठावंत भाजपा गटाच्या प्रतिनिधी असल्याने शहरातील जुण्याजाणत्या भाजपायींना दिलासा मिळाला. जगताप-लांडगे हे किती केले तरी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेत. आता हे त्रिकुट महापालिकेत पुन्हा सत्ता आणणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. भाजपाकडे गेलेली आपली सत्ता खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादीने जबरदस्त मोर्चेबांधनी सुरू केली आहे. प्रभाग रचनेपासून, आरक्षण सोडतीपर्यंत डोळ्यात तेल घालून राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते लक्ष ठेवून असतात. मागच्या पराभवाने तोंड पोळल्याने आता ताकही फुंकून पितात. भाजपाच्या भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणे राष्ट्रवादीने बाहेर काढली. शिवेसेनेने आतापासून एक प्रचाररथ चौकाचौकात थांबवून भाजपाच्या भ्रष्ट कारभाराच्या कुंडलीचे वाचन सुरू केले आहे. खरे तर, लोक शिवसेनेच्या त्या चित्ररथाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कारण पाच वर्षे शिवसेना डोळे झाकून बसली होती. राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असताना भाजपाच्या एकाही भ्रष्टाचाराची चौकशी लावू शकले नाही, कारवाई दूर राहिली. भाजपाने केलेल्या भ्रष्टाचारावर प्रथम राष्ट्रवादीचे आणि आता शिवसेनेचे ढोंग लोक ओळखतात. भाजपा केंद्रात असल्याने ईडी, सीबीआयचा वापर करुन राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादीला उघडे पाडत असेल तर महापालिकेतील प्रकरणांवर भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आणायला ठाकरे, पवार यांचे हात कोणी बांधले आहेत का, असे लोक विचारतात. उद्या महाआघाडी म्हणून लढायचे झाल्यास शिवेसेनेला जेमतेम २५-३० जागांवर समाधान मानावे लागेल, अशी संघटनेची दुर्दैवी परिस्थिती आहे. गेल्यावेळी १०९ जागा लढवून जेमतेम ९ जिंकल्या. आता काँग्रेसला झिरो पासून सुरवात करायची असल्याने ५-१० जागांवर त्यांची बोळवण होऊ शकते. राष्ट्रवादीने १०० जागा जिंकायचे टार्गेट ठेवल्याने त्यांना किमान १२५ जागा लढवाव्या लागणार. असे त्रांगडे झालेच तर संभाव्य महाआघाडीचे निवडणुकिच्या आधीच वाजणार, अशीही शक्यता आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीसाठी लक्ष्य घातले, पण आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार कायम द्विधा मनस्थितीत असतात. राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक भाजपामध्ये येणार होते ते अद्याप जागेवर थांबले आहेत. दुसऱ्या बाजुला भाजपाचे तीन-तीन आमदार तसेच फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची ताकद आहे. घोडेमैदान जवळ आहे.