खोदकामामध्ये भूमिगत वीजवाहिनी तोडणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध महावितरणकडून तक्रार दाखल

0
257

पुणे, दि. १४ (पीसीबी) – कोंढवा रोड परिसरातील साळुंखे विहार, एनआयबीएम, सह्याद्री पार्क परिसराला वीजपुरवठा करणारी २२ केव्ही भूमिगत वीजवाहिनी पाइपलाईनच्या खोदकामात तोडल्यामुळे महावितरणचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १३) महावितरणकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, फुरसुंगी येथून २२ केव्ही क्षमतेच्या भूमिगत वीजवाहिनीद्वारे सिद्धीविनायक उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो व या उपकेंद्रातील दोन वीजवाहिन्यांद्वारे कोंढवा रोड परिसरातील सांळुखे विहार, एनआयबीएम परिसर तसेच सह्याद्री पार्क या परिसरातील सुमारे ७ हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र रविवारी (दि. १२) पहाटे २.२४ वाजता फुरसुंगी येथून वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रीच्या अंधारात तसेच पावसामुळे बिघाड शोधणे अवघड असल्याने महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी या परिसराला पर्यायी वीजपुरवठा करण्यासाठी ताबडतोब तांत्रिक उपाययोजना सुरु केली. त्यानंतर सकाळी ७.४५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व परिसरामध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान रविवारी सकाळी भूमिगत वीजवाहिनीमधील बिघाड शोधत असताना उंड्री रस्त्यावरील मार्व्हल सांघ्रिया या इमारतीजवळ पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनसाठी सुरु असलेल्या खोदकामामध्ये महावितरणची भूमिगत वीजवाहिनी तोडल्याचे आढळून आले. पिण्याच्या पाइपलाईनमधील लिकेजचे पाणी तिथे साचले होते. दुरुस्ती काम सुरु करण्यापूर्वी पंप लाऊन खड्ड्यातील पाण्याचा उपसा करावा लागला. त्यानंतर वीजवाहिनीला जाईंट लावण्याचे काम करण्यात आले. परंतु खोदकामामध्ये वीजवाहिनी तोडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता व यामध्ये महावितरणचे सुमारे ३० हजार युनिटचे म्हणजे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.