वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची कत्तल नको… भास्कर रिकामे

0
655

निगडी दि. १२ (पीसीबी) – दिनांक १४ जून रोजी वटपौर्णिमा उत्सव संपूर्ण देशांमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. आपले सर्व सण वउत्सव व परंपरा या निसर्ग रक्षणासाठी जोडलेल्या असून त्यानिमित्ताने वेगवेगळ्या पध्दतीने निसर्गातील प्रत्येक सजीव घटकाचे पूजन किंवा रक्षण केले जाते.

वडापांसून सर्वात जास्त प्रमाणात व बाराही महिने ऑक्सिजन मिळतो, त्यासाठी वडाचे रक्षण करण्यासाठी त्याला प्राचीन काळापासून देवत्व बहाल केले आहे. पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून आपल्या मृत किंवा मुर्च्छीत झालेल्या पतीचे प्राण वडाच्या झाडाखाली परत मिळवले.

तेव्हापासून श्रध्देने सर्व महिला पौर्णिमेला वडाची पुजा करतात. वडाच्या झाडाची निसर्गातील उपयुक्तता लक्षात घेऊन पूजेच्या निमित्ताने एक दिवस वडाच्या सानिध्यात व्यतीत करावा हा प्रथेमागील यामाघील मुख्य उद्देश आहे.

तथापि आजकाल शहरामध्ये सर्रास ठिकाणी वडाच्या झाडांच्या फांद्या विकत आणून त्याची पुजा केली जाते. त्यामुळे वडाचे पूजन करण्यामागील शास्त्रीय कारण बाजूला राहतेच, पण मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल मात्र होते.

तरी सर्व माताभगीनींना विनम्र आवाहन आहे की, आपण आपल्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाचीच पूजा करावी, जर जवळपास झाड उपलब्ध नसेल कागदावर वडाचे चित्र काढून ते तुळशीच्या कुंडीत ठेऊन पूजा करावी. परंतु कोणत्याही परिस्थितीत वडाची फांद्या घरी आणून त्यांची पूजा करु नये.