आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना दरमहा अर्थसहाय्य द्या : भाऊसाहेब पाटोळे

0
255

महाराष्ट्र मजूर पक्षाचे पिंपरीत भीक मागो आंदोलन

पिंपरी, दि. ११ (पीसीबी ) – केंद्र आणि राज्य सरकार रोजच इंधन दरवाढ करीत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, पालेभाज्या, डाळी, तेल व इतर आवश्यक सेवा यांचे भाव वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबीयांची क्रयशक्ती संपुष्टात आली आहे. या वाढत्या महागाईचा सामना करणे दुर्बल घटकातील कुटुंबांना आता अशक्य होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आता केंद्र व राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक कुटुंबांना दरमहा पाच हजार रुपये अनुदान द्यावे. अन्यथा १ जुलै रोजी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचेरी समोर महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र मजूर पक्षाचे राष्ट्रीय नेते भाऊसाहेब अडागळे यांनी पिंपरी येथे दिला.
गुरुवारी (दि. ९ जून) महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आणि वाढत्या महागाई विरोधात “भीक मागो आंदोलन” करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मजूर पक्षाचे सचिव बाळासाहेब गवळी, पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी चव्हाण, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष मयूर गायकवाड, प्रवक्ता प्रकाश कदम, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सविता आव्हाड, वाहतूक अध्यक्ष सुरेश मिसळ, महिला शहराध्यक्ष मनीषा प्रधान, हवेली तालुका अध्यक्ष मनीषा रणदिवे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दत्ता तेलंग आदींसह महाराष्ट्र मजूर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब आडागळे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती वापराचा गॅस यांचे रोजच भाव वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढत आहे आणि जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ होत आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भीक मागो आंदोलन केले आहे. याची सरकारने दखल घ्यावी आणि दुर्बल घटकातील कुटूंबियांना मासिक पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे.