देवाच्या दारात पत्रिका ठेवण्यासाठी गेलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

0
471

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – बुधवारी ८ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास अक्कलकोट- गाणगापूर रस्त्यावर बिंजगेर येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये हिंजवडी परिसरातील तीन उमद्या तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिपक सुभाष बुचडे (२९, रा. मारुंजी), आकाश ज्ञानेश्वर साखरे (२८, रा. हिंजवडी), आशुतोष संतोष माने (२३, रा. हिंजवडी) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक यांचे चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे (४१, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी अक्कलकोट (दक्षिण) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात ट्रक (ट्रेलर) चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत दीपक बुचडे याचा १८ जून रोजी लग्नसोहळा पार पडणार होता. त्यासाठी लग्न पत्रिका छापण्यात आल्या होत्या. लग्नाची सर्व जय्यत तयारी झाली होती. नातेवाईकांना पत्रिका देण्यापूर्वी देवाच्या दारात पत्रिका ठेवण्यासाठी तिघेजण बुधवारी सकाळी तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोटला निघाले होते. दरम्यान, दीपक याने बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घरी फोन केला. तुळजापूर येथे पत्रिका ठेवल्यानंतर आम्ही आता गाणगापूरच्या दिशेने जात असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, साडे अकराच्या सुमारास अक्कलकोट पोलिसांनी फोन करून दीपक यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती दिली.

दीपक यांच्या गाडीला अपघात झाल्याचे समजताच हिंजवडीसह मारुंजी परिसरातील तरुणांनी अक्कलकोटच्या दिशेने धाव घेतली. फिर्यादी चंद्रकांत यांनी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता तिघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे हिंजवडीसह मारुंजी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातात मृत्यू झालेला आकाश साखरे हा परिसरात ‘अक्की’ नावाने सर्वांनां परिचित होता. तसेच, रिल्स बनवण्याची आवड असल्याने तो कायम चर्चेत असायचा. अक्कीच्या रिल्सला चांगला प्रतिसाद मिळत होता. वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांवर आकाश रिल्स बनवत असल्याने परिसरातील तरुणांमध्ये त्याची क्रेझ होती. आकाशचा देखील काही महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे.