औरंगाबाद, दि. ८ (पीसीबी) : “मी विधानपरिषदेचा अर्ज भरणार नाही, इतर शिवसेना उमेदवारांना संधी देणार,” असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले. औरंगाबादमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी सुभाष देसाई औरंगाबादमध्ये आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विधानपरिषद उमेदवारीसह अनेक विषयांवर भाष्य केलं.
विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक सहज निवडून येऊ शकतात. भाजपने पाच उमेदवार जाहीर केल्याने दहाव्या जागेसाठी चुरस होऊ शकते. त्यातच शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांचाही कार्यकाळ संपणार आहे. विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमश्या पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तिसऱ्या जागेसाठी सुभाष देसाई यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत चर्चा सुरु असतानाच सुभाष देसाई यांनी मात्र आपण अर्ज भरणार नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, “यावेळी आम्ही काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेचा अर्ज भरण्याबाबत माझा काही प्रश्न नाही इतर दोघांना आम्ही संधी दिली आहे. मी स्वतः अर्ज भरणार नाही. उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. हा माझा स्वतःचा निर्णय आहे.”
भाजपकडून कोणाला उमेदवारी?
राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत.
या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण
विधान परिषदेवर भाजपकडून असलेले प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत तसेच दिवंगत नेते आरएस सिंह यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते, मंत्री सुभाष देसाई हे निवृत्त होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड यांचाही कार्यकाळ संपत आहे.
10 जागांसाठी निवडणूक कधी?
विधानपरिषदेतील दहा जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली असून 9 जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत. परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. जुलै महिन्यात विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, मात्र नियमानुसार त्यापूर्वी निवडणूक घ्याव्या लागतात, असे राजकीय जाणकार सांगतात
कसं असू शकतं संख्याबळ?
विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. म्हणजे राज्यसभा निवडणूकीप्रमाणेच राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 27 मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, शिवसेनेकडे 56 तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. मात्र, विधानपरिषदेवर काँग्रेसचाही दुसरा उमेदवार देण्यात यावा, यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र, काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणायचा असल्यास भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल.
            
		











































